छायाचित्र प्रदर्शनीतून महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीचे प्रतिबिंब - पालकमंत्री मदन येरावार

v माहिती व जनसंपर्क विभागाच्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन




यवतमाळ, दि. 22 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेत राज्यातील अनेक प्रतिभावंत कलाकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी हुबेहुब रेखाटन करून आपल्यातील प्रतिभा लोकांपर्यंत पोहचविली आहे. राज्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात झालेल्या सर्वांगीन प्रगतीचे प्रतिबिंब या प्रदर्शनीत उमटले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
नगर भवन येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, न.प.शिक्षण सभापती कीर्ति राऊत, केळापूरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
ही प्रदर्शनी अत्यंत उत्कृष्ट आणि महत्वाची आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, अधिवेशन काळात ही प्रदर्शनी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर यवतमाळच्या नागरिकांसाठी ती उपलब्ध झाली आहे.  प्रदर्शनी बघितल्यावर असे वाटते की, छायाचित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांना तोड नाही. अनेक विषय यात घेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील कुंभाराने मातीचे मडके बनविणे, शिक्षणाचा उंचाविलेला दर्जा, वृक्षलागवड, ग्लोबल वॉर्मिंगबाबत संदेश, गणपती विसर्जन, पांडूरंगाची वारी, महालक्ष्मी पूजन, विविध सांस्कृतिक दर्शन यात अनुभवास मिळतात. यवतमाळकरांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा. यातून एक नवीन उमेद निर्माण होईल, असे पालकमंत्री म्हणाले.
या छायाचित्र प्रदर्शनात समाज जीवनातील अनेक पैलू मांडण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्राचे दर्शन यात होते. या प्रदर्शनीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. तर ही छायाचित्र प्रदर्शनी शहरवासियांसाठी एक पर्वणी ठरेल. माहिती व जनसंपर्क विभागाचा हा उपक्रम अतिशय अभिनंदनीय आहे, असे नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या.
या प्रदर्शनीत शैक्षणिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा यासह शासनाच्या जलयुक्त शिवार, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्कूल चले हम, आम्ही सावित्रीच्या लेकी, संकल्प वृक्षारोपणाचा, नारी शक्तीला सलाम, सौर पंपाने केली किमया, स्वच्छ भारत मिशन आदी विषयांवरील छायाचित्र लावण्यात आले आहे. सदर छायाचित्र प्रदर्शनी दिनांक 22 जानेवारी ते 24 जानेवारी 2018 या कालावधीत सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुली राहील.
                           000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी