अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर

v विशेष तरतुदीनुसार 100 टक्के निधी अदा करण्याला मंजूरी
v  पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्याला यश

यवतमाळ, दि. 10 –  यावर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत बेंबळा प्रकल्पातून पाणी आणण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित कंपनीकडून पाईपचा पुरवठा नियमित होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत हा पुरवठा होण्यास अडचण निर्माण होत होती. या गंभीर बाबीवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून शासनाच्या वतीने जिल्ह्यातील पाईपलाईनचा पुरवठा नियमित करण्यासाठी विशेष तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला आता गती मिळणार आहे.
यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 302 कोटी रुपये खर्च करून अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत पाण्याच्या 16 टाक्या आणि 3 उंच टाक्या बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी सुरुवातीला 30 महिन्यांचा होता. ऑक्टोबर 2019 पर्यंत हे काम अपेक्षित होते. मात्र यावर्षी पाणीटंचाई पाहता मार्च- एप्रिल 2018 पर्यंत बेंबळाचे पाणी आणण्याचे नियोजन आहे. बेंबळा ते टाकळी फाटा या 19.75 किलोमीटर पर्यंतच्या प्रस्तावित जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत 1 हजार एम.एम.(डीआय) डकटाईल आयर्न पाईप संबंधित कंत्राटदार टप्प्याटप्प्याने आणणार होते. आतापर्यंतच्या करारानुसार पाईपसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून त्यासाठी 60 टक्के रक्कम अदा केली जात होती. त्यामुळे पाईप आणण्यात अडचणी व अनियमितता होती.
ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर पाईपचा पुरवठा झाला तर पाण्याचे नियोजन लवकर करता येईल. तसेच नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून देता येईल, या उद्देशाने पालकमंत्री मदन येरावार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना ही बाब प्राधान्याने घेण्यास सांगितले. त्यानुसार नगर विकास विभागाने आता पाईपसाठी 60 टक्के रक्कम अदा करण्याऐवजी संबंधित कंपनीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून 100 टक्के निधी त्वरीत उपलब्ध करून दिला जाईल, असे आदेश काढले. शिवाय 50 टक्के नागरी काम झाल्याशिवाय पंपींग मशीनचे टेंडर काढता येत नाही, असा नियम आहे. पालकमंत्र्यांनी विशेष तरतूद म्हणून केवळ 18 टक्के नागरी काम झाले असतांना पंपींग मशीनसाठी टेंडर काढण्यासाठी पाठपुरावा केला. यानुसार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने बेंबळावर 550 हॉर्स पॉवरचे 4 पंपींग मशीन आणि टाकळी येथील फिल्टर प्लाँटवर 200 हॉर्स पॉवरच्या 4 पंपींग मशीनचे टेंडर काढण्याला मंजूरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी दिली.
                                  000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी