समाज जीवनात साहित्यिक, कवी, लेखक यांचे स्थान मोठे - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

v वणी येथील 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप

यवतमाळ, दि. 21 : समाज जीवनात अनेक‍ स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो. त्यामुळेच या व्यक्तिंचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वणी येथील 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, प्रसिध्द दिग्दर्शक राजदत्त, विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वामन तेलंग,  संजोजक माधव सरपटवार, श्रीपाद जोशी, विलास मानेकर, दिलीप अलोणे आदी उपस्थित होते.
शिक्षण आणि साहित्य क्षेत्र हे स्वायत्त असले पाहिजे, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जीवन जगतांना विचार महत्वाचा आहे. लोकशिक्षण आणि लोकसंस्कार हे विचाराशी निगडीत असतात. भारत हा सुसंस्कृत देश आहे. मुल्याधिष्ठित परिवारपध्दती आणि समाजसंस्कृती आपली ताकद आहे. साहित्य, संस्कृती, नाटक, चित्रपट हे समाज जीवनावर संस्कार करणारे घटक आहेत. मराठी साहित्य खुप मोठे आहे. विदर्भात साहित्य संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. पैसे मिळविल्याने सुख मिळत नाही ते सुख एखादे चांगले पुस्तक वाचल्याने हमखास मिळते. त्यामुळे मानवी जीवनात पुस्तकाचे वा साहित्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. साहित्यिक, लेखक, कवी यांच्या लेखणीतून निघणारे शब्द राष्ट्रनिर्माणासाठी उपयोगी पडतात. साहित्यिकांनी लिहिलेच पाहिजे तसेच साहित्यिकांमध्ये मनभेद होता कामा नये, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलने ही लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्काराची केंद्रे असतात. त्यामुळे साहित्यिकांच्या हातून मुल्याधिष्ठित समाज घडो, अशा शुभेच्छा नितीन गडकरी यांनी दिल्या. यावेळी माजी खासदार विजय दर्डा, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विचार व्यक्त केले. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते सकाळचे संपादक शैलेश पांडे, महाराष्ट्र टाईम्सचे सहायक संपादक अविनाश महालक्ष्मे, लेखक अजय देशपांडे, देवानंद सोनटक्के, गौरव खोंड, सुदर्शन बारापात्रे, पोलिस विभागातील शेखर वांढरे, प्रल्हाद ठग आदींचा सत्कार करण्यात आला.
                                                            00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी