सावरकर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत सेवालाल आणि बिरसा मुंडा यांची जयंती आता शासनस्तरावर साजरी

v सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्याला यश
यवतमाळ, दि. 05 : राष्ट्रपुरुष तसेच थोर व्यक्ती यांची जयंती दरवर्षी मंत्रालय आणि राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. या वर्षीपासून सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या विशेष प्रयत्नातून संत सेवालाल महाराज जयंती (दि. 15 फेब्रुवारी), संत गाडगे बाबा महाराज जयंती(दि. 23 फेब्रुवारी), संत तुकडोजी महाराज जयंती (दि. 30 एप्रिल), स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती (दि. 28 मे) आणि बिरसा मुंडा जयंती (दि. 15 नोव्हेंबर) साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले समाजसुधारक, महापुरुष संत सेवालाल यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याची समाजाची मागणी होती. संत गाडगे बाबा महाराज यांनी स्वच्छतेबाबत महान असे कार्य केले. 1876 मध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग करून खेडोपाडी स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधन, समाजकार्य आदींसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. खेडोपाडी फिरून झाडू हाती घेत स्वच्छता केली. त्यांच्या कार्यातून पुढे शासनाने स्वच्छतेबाबत अनेक अभियान हाती घेतले. मात्र त्यांची जयंती शासनस्तरावर साजरी केली जात नव्हती. आता त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची शासकीय कार्यालयात अंमलबजावणी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
आधुनिक काळातील महान संत असलेल्या तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. विदर्भ, महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. जपानसारख्या देशात जाऊनही त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती.
भारतीय स्वातंत्र्यलढयातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण असलेले विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. विशिष्ट तत्वज्ञान, विज्ञानाचा पुरस्कार, समाज क्रांतिकारक, प्रतिभावंत साहित्यिक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. आदिवासी जनजाती मधील मुंडा जमातीचे स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध आदिवासींचा सशस्त्र लढा उभा केला आणि स्वातंत्र्यचळवळीत प्राणार्पण केले. ते आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहेत.
या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याची मागणी समाजातून पुढे आली होती. या मागणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनातर्फे दरवर्षी साजरी करण्यात येणाऱ्या जयंत्यांमध्ये या पाच महापुरुषांच्या जयंत्यांचा समावेश करण्यात यश मिळविले आहे. या माध्यमातून विविध समाजघटकांच्या अनेक वर्षांच्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी