सर्व घटकांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील - पालकमंत्री मदन येरावार







v जिल्ह्यात फॅगशीप योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
v पाण्याच्या संवर्धनासाठी श्रमदान करा
v टंचाईच्या काळात काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 2 : या देशातील गोरगरीब, सामान्य नागरिक, शेतकरी, दुर्बल व वंचित घटक यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या आहेत. त्याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. समाजातील सर्व घटकांसाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टल ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आदी उपस्थित होते.   
शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्य शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. सन 2001 पासून सर्व पात्र शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 80 हजार  शेतक-यांच्या खात्यात 986 कोटी 92 लक्ष रुपये वळते करण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या कर्जवाटपाला बँकामधून सुरवात झाली आहे.
उज्वला गॅस योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात अव्वल आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 92 हजार 781 महिलांना उज्वला गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. कामगार विमा योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणा-या मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत भवन तसेच कर्मचा-यांच्या निवास स्थानासाठी 4 कोटी 70 लक्ष मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात कृषी महाविद्यालयालासुध्दा मंजूरी मिळाली आहे.
स्व.बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास करण्यासाठी विशेष सवलत देण्यात येत आहे. तसेच शहीद झालेल्या वीर जवानांच्या एका वारसाला शैक्षणिक पात्रतेनुसार राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘रस्ता सुरक्षा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाखांचा आरोग्य विमा मोफत मिळणार आहे. यवतमाळ जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला असून जिल्ह्यात एकूण 4 लक्ष 25 हजार 821 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ च्या कामात जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 5 हजार 336 शेततळ्यांची निर्मिती झाली आहे.
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 18 हजार 871 कामे पूर्ण करण्यात आली आहे. पुसद तालुक्यातील गौळमांजरी येथे सौरउर्जेवर 100 टक्के घरगुती विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. ई-फेरफार प्रमाणीकरण अंतर्गत राज्यातील पहिल्या 20 तालुक्यात 11 तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. आजपासून संपूर्ण 16 तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीने सातबारा देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, असे ते म्हणाले.
यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून पाण्याच्या संवर्धनासाठी नागरिकांनी श्रमदान करावे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहे. 80 गावांचा ग्रामीण पाणी पुरवठा सोलरवर करण्यात आला आहे. लोहारा जलशुध्दीकरण केंद्र ते लोहारा पाण्याच्या टाकीपर्यंत पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील जवळपास 70 हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कठीण परिस्थितीत नागरिकांनीसुध्दा पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, अलकनंदा पुंजाजी सरोदे, सत्वशिला साहेबराव काळे, मंगला देवचंद सोनोने, नंदाबाई दादाराव पुरम आणि स्नेहा विकास कुळमेथे यांना परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये आजीवन मोफत पास सवलतीचे कार्ड देण्यात आले. यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्यासह 17 पोलिस जवानांचा तसेच संत तुकाराम वनग्राम पुरस्काराने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचा आणि आदर्श तलाठ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शहीद कुटुंबातील सदस्य, जि.प. व न.प.सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी