चापडोह धरणग्रस्तांना त्वरीत मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री मदन येरावार


                                             
v यावली येथे वाढीव धनादेश वाटप कार्यक्रम
यवतमाळ, दि. 28 : यवतमाळ शहराची तहान भागविणा-या चापडोह धरणासाठी यावली येथील शेतक-यांनी जमिनी दिल्या. या धरणासाठी ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, त्या शेतक-यांना शासनाने मोबदला दिला. मात्र वाढीव मोबदल्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यानंतर तो मंजूर करण्यात आला. यानंतरही काही उर्वरीत शेतकरी मोबदल्यापासून वंचित असतील तर त्यांना तो मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यावली येथे वाढीव धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, गावच्या सरपंचा ज्योती वरठी, उपसरपंच विनोद चव्हाण, तंटामुक्त समितीचे विठ्ठल जाधव, मोनाली राठोड आदी उपस्थित होते.
 चापडोह धरणाच्या विकासात यावलीकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, चापडोहमुळे यवतमाळची तहान भागते. पिण्याच्या पाण्यासाठी कार्यरत होणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. नगर पालिका हद्दित पाणी पुरवठा होत असल्यामुळे हे धरण नगरविकास विभागाकडे आहे. महसूल विभागाचे काम भुसंपादन करून मोबदला देण्याचे आहे. या धरणासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचा मूळ मोबदला 2 कोटी 57 लक्ष रुपयांचा होता. वाढीव मोबदल्याकरीता काही जण न्यायालयात गेले आहेत. शासनाने वाढीव मोबदल्याची 1 कोटी 6 लक्ष रुपये एवढी रक्कम न्यायालयात जमा केली असून संबंधितांना तो मोबदला आता न्यायालयातून मिळेल. आज 27  लाभार्थ्यांना 31 लक्ष 6 हजार 400 रुपयांचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त आणखी काही जण मोबदल्यापासून वंचित असतील तर त्यांना त्वरीत मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
यावली परिसरात विंधन विहीर, ग्रामपंचायत भवन, सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच काँक्रीट रस्त्याचेसुध्दा बांधकाम झाले आहे. 2018-19 मध्ये यावलीचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात प्राधान्याने करण्यात आला आहे. वॉटर कप स्पर्धा सध्या लोकचळवळ झाली आहे. या माध्यमातून गावक-यांनी गावचे पाणी गावातच जिरविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच नाला खोलीकरण, रुंदीकरण आदी कामात द्यावे. मागेल त्याला शेततळे या योजनेकरीता ऑनलाईन अर्ज केल्यास ते त्वरीत उपलब्ध करून देण्यात येईल. शेततळ्यांसाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रमण चव्हाण, वसंत चव्हाण, कांताबाई चव्हाण, मारोती दडमल यांच्यासह 27 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी