पालकमंत्र्यांनी घेतला श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज समाधी स्थळ विकासाबाबत आढावा


v प्रथम टप्प्यात सहा तर दुस-या टप्प्यात चार कोटींचा निधी वितरीत


यवतमाळ, दि. 25 : दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज समाधी स्थळाच्या विकासाबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी आज (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत लाखाणी, नगररचना विभागाचे सहायक संचालक मा.गो.सुर्यवंशी, मुंगसाजी महाराज देवस्थान संस्थानचे अध्यक्ष संजय देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज समाधी स्थळाच्या पायाभुत विकासासाठी शासनाने 25 कोटी रुपये मंजूर केले आहे. यात सर्व पायाभूत सुविधांचा समावेश आहे. आतापर्यंत सहा कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून यात महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह व बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम, पालखी मार्गाचे बांधकाम आणि धामणगाव ते कोहळा रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत 19 कोटी रुपयांपैकी प्रथम टप्प्यात चार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार ज्या बाबींच्या विकासासाठी मंजूरी देण्यात आली, त्यावर निधी खर्च करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
19 कोटी रुपयांच्या मंजूरीमध्ये दर्शन बारीचे बांधकाम करणे, सामूहिक प्रसाधनगृहाचे बांधकाम, राम मंदिरासमोरील खुल्या जागेमध्ये सभामंडपाचे बांधकाम, भोजन कक्षाचे बांधकाम, बालउद्यान व शेडनेटसह इतर बाबींचे बांधकाम, मुख्य मंदीर व चिंच मंदीर परिसरातील भक्त निवासाचे बांधकाम, सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस चौकीचे बांधकाम, धामणगाव (देव) येथे येणा-या सर्व पोच मार्गाचे बांधकाम, भाविकांकरीता स्वागत कक्ष व लॉकर कार्यालयाचे बांधकाम, आरोग्य सुविधा केंद्र व इतर सुविधांचे बांधकाम, बस स्थानकाचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, पाणी पुरवठा व्यवस्था व विद्युत पुरवठा व्यवस्था आदी कामे करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी