पालकमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल स्वाक्षरी सातबाराचे वाटप





v उत्कृष्ट काम करणा-या तलाठ्यांचा सत्कार
      यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र दिनानिमित्त यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातसुध्दा पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, राष्ट्रीय सुचना केंद्राचे कन्नेवार आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, डिजीटल स्वाक्षरी सातबारा वाटप कार्यक्रम संपूर्ण राज्यात आजपासून सुरू झाला आहे. याकरीता महसूल विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी मेहनत घेतली. सातबारा हा शेतक-यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अनेक अडचणींचा सामना करीत महसूल विभागाने कमी दिवसात हे काम केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहे. अनेक बाबतीत जिल्हा अव्वल आहे. डिजीटल स्वाक्षरी सातबारा वाटपातसुध्दा यवतमाळ जिल्ह्याने अव्वल राहावे. महसूल विभाग हा सर्वसामान्य माणसाशी निगडीत असा विभाग आहे. त्यामुळे समाजाची मोठी जबाबदारी या विभागावर आहे. गोरगरीब जनतेला चांगली सेवा देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यामुळे अधिक मेहनत पुढील एक-दोन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील शेतक-यांना डिजीटल स्वाक्षरी सातबारा उपलब्ध करून द्या, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रमेश तातोबा बोरकर, शांता मणिराम शिरबंदी, यमाजी लक्ष्मण आत्राम, लेतु हरबा रामगडे, हनुमंता बापुराव रामगडे, नारायण वनमाळी, पार्वता रामगडे आदींना डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा देण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणा-या भुमिका विधळे, व्ही.जी.पाचकोरे, मोबीन हुसेन सिदिृकी, आर.एस.वाघमारे यांच्यासह 14 तलाठ्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी पालकमंत्र्यांचा डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा त्यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सुचना केंद्रात कार्यरत असलेल्या सोनल झोड यांच्यासह विविध गावांचे तलाठी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिचबर्डी येथे पालकमंत्र्यांनी केले श्रमदान : ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप मध्ये सहभागी झालेल्या चिचबर्डी गावात पालकमंत्री मदन येरावार यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त श्रमदान केले. यावेळी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, तहसीलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, राजू निवल, समाधान इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, वॉटर कप स्पर्धेमधे यावर्षी राज्यात सर्वात जास्त तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ हे या लोकचळवळीत सहभागी होऊन श्रमदान करीत आहे. निसर्गाने मानवाला जल, जंगल, जमीन मोफत दिली. मात्र स्वत:च्या फायद्यासाठी मानवाने नैसर्गिक संपत्ती नष्ट केली. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.  नागरिकांना आता पाण्याचे महत्व पटले आहे. आपले गाव पाणीदार करण्यासाठी प्रत्येक गावात सर्वदूर हा कार्यक्रम सुरू आहे. वॉटर कप स्पर्धेसाठी जलयुक्त शिवारमधून यावर्षी शासनाने दीड लक्ष रुपये दिले आहे.
पाणी संवर्धन करण्यासाठी अनेक जण उन्हात श्रमदान करीत आहे. यामुळे पिण्याचे पाणी तसेच पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. या कामात सहभागी सर्व लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना, विद्यार्थी, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदींचे यावेळी पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, समाज कल्याण अधिकारी मंगला मून, गटविकास अधिकारी सुभाष मानकर आदींनी महाश्रमदानात सहभाग नोंदविला.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी