आगामी वर्षात टँकरमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट ठेवा - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर




       यवतमाळ, दि. 2 : यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी यवतमाळ जिल्हा हा पाण्याचे स्त्रोत असलेला जिल्हा आहे. अशा स्त्रोतांचा शोध घेऊन पिण्याचे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना त्वरीत पूर्ण करून सन 2018-19 या वर्षात जिल्हा टँकरमुक्त करण्याचे अधिका-यांनी उद्दिष्ट ठेवावे, अशा सुचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जिल्हा खनीकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी. राठोड आदी उपस्थित होते.
            गतवर्षी ग्रामीण भागात तसेच शहरात टँकरची संख्या कमी होती, मात्र यावर्षी त्यात वाढ झाली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता नाही. ती शोधून काढणे गरजेचे आहे. पुढील वर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संबंधित अधिका-यांनी आतापासूनच नियोजन करावे. बाधित क्षेत्रातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची कामे प्राधान्याने पूर्ण करा. प्रत्येक गावातील प्रत्येक नाल्याचे एक-एक किलोमीटर खोलीकरण करा. बाधित क्षेत्रातील प्रत्येक शाळा, पथदिवे सोलरवर घ्यावे. वणी परिसरातील निर्गुडा नदी आणि तलावाची कामे त्वरीत करा. नाला, तलाव, नद्यांचे खोलिकरण उन्हाळ्यातच करणे गरजेचे आहे. या कामांना प्राधान्याने पूर्ण करा. बेंबळा धरण मुख्य कालवा 113 किमी आहे. कालव्याच्या शेवटचे काम अपूर्ण ठेवू नका. तसेच अरुणावतीचे लाभक्षेत्र वाढवून जास्तीत जास्त सिंचन करण्यावर भर द्यावा. त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध केला जाईल. वणी शहरालगतचा कोल्हापूरी बंधारा शहरात पाणी देण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची देखभाल दुरुस्ती नगर पालिकेकडे देण्याबाबत ठराव घ्यावा. जनावरांना पाणी पिण्यासाठी नवीन हौद तयार करून त्याची देखभाल दुरूस्ती ग्रामपंचायतीने करावी, असे गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले.
            यावेळी त्यांनी संसद आदर्श ग्राम, स्थानिक विकास निधी, सिंचन विभाग, ग्रामीण व शहर पाणी पुरवठा, खनीज निधी, कृषी, पर्यावरण, आरोग्य, पशुसंवर्धन, जलयुक्त शिवार आदींचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी