विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 490 मतदार



v जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक
यवतमाळ दि. 06 : जिल्ह्यात 31 जानेवारी 2020 रोजी होणा-या विधान परिषदेच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीत एकूण 490 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगर पालिका आणि नगर पंचायतीचे सदस्य यांचा समावेश राहील. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, संबंधित यंत्रणेने शासकीय कार्यालय, इमारती तसेच सार्वजनिक जागेवरील पोस्टर्स, बॅनर्स, फलक त्वरीत हटवावे. तसेच नगर पालिकेनेसुध्दा खाजगी इमारतीवरील अनधिकृत राजकीय जाहिराती काढाव्यात. प्रचारात शासकीय वाहनांचा उपयोग होणार नाही, याची काळजी घ्यावी. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत नवीन निविदा प्रक्रिया, कामाचे आदेश देता येणार नाही. व्हीडीओ टीम, फ्लाईंग स्कॉडचे गठन त्वरीत करावेत, अशा सुचना त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) श्रीकांत देशपांडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, नगर पालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 
जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 7 जानेवारी 2020 असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अखेरची तारीख 14 जानेवारी 2020 आहे. नामनिर्देशपत्राची छाननी 15 जानेवारी रोजी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक 17 जानेवारी आहे. मतदान 31 जानेवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत घेण्यात येईल. मतमोजणी 4 फेब्रुवारी रोजी तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 6 फेब्रुवारी 2020 आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी