मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण






यवतमाळ, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे पार पडला. यावेळी वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार आदी उपस्थित होते.
            यावेळी उपस्थितांना शुभेच्छा संदेश देतांना पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारक आणि शहिदांनी दिलेले बलिदान, घटना समितीने तयार केलेली राज्यघटना, त्यानुसार चालणारा कारभार आदी बाबींना उजाळा दिला. तसेच 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधी ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ पंधरवडा साजरा करायचा असून या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घ्यावी. शाळा-महाविद्यालयांनी या संदर्भात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चर्चासत्र आदींचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
            देशाच्या सीमेवर लष्करी कार्यवाही, युध्द किंवा युध्दजन्य परिस्थितीत आणि देशाच्या संरक्षणासाठी सैन्य दलातील अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली अशा शहिदांच्या वीरपत्नी, त्यांच्या आई-वडीलांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यात पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथील रहिवासी वीर पिता यशवंत थोरात, यवतमाळ येथील विठ्ठलवाडीतील रहिवासी वीरनारी  मंगला देवचंद सोनवणे, संभाजी नगर यवतमाळ येथील वीरनारी नंदाबाई दादाराव पुराम, वाघापूर येथील रहिवासी वीरनारी सुनिता प्रकाश विहिरे यांचा समावेश होता.
            कार्यक्रमाचे संचालन शिक्षक चंद्रबोधी घायवटे आणि शिक्षिका ललिता जतकर यांनी केले. यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, वीर पिता, वीर माता, विर पत्नी, शेतकरीबंधू लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी