मतदार जनजागृतीमुळे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने






v राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीसह विविध स्पर्धांचे आयोजन
यवतमाळ, दि. 25 : गतवर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या दोन्ही निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव जिल्हा प्रशासन मतदारांना करून देत आहे. या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास दोन लाख मतदारांची वाढ झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगिता राठोड, पोलिस उपअधिक्षक (गृह) एम.एम.बागवान, तहसीलदार कुणाल झाल्टे, भाग्यश्री देशमुख आदी उपस्थित होते.
            निवडणुका या लोकशाहीचा प्राण आहे, असे सांगून श्री. गुल्हाने म्हणाले, गत निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यात 19 लक्ष 71 हजार मतदार होते. प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष जनजागृती मोहिमेमुळे मतदारांच्या संख्येत दोन लाखांनी वाढ झाली आहे. 11 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 75 हजार 665 मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्यासुध्दा दुप्पटीने वाढली असून महिला मतदारांच्या टक्केवारी वाढ, ही गौरवाची बाब आहे. लोकशाहीमध्ये स्वत:चा सहभाग नोंदवायचा असेल तर त्याचा पहिला टप्पा हा मतदार म्हणून नोंदणी करणे होय. त्यामुळे 18 वर्षांवरील नवयुवकांनी मतदार म्हणून आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे. आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावतांना इतरांनाही याचे महत्व सांगून मतदानासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारत निवडणूक आयोगाची स्थापना, त्याची कार्यपध्दती, जागतिक पातळीवर भारतीय लोकशाहीची घेण्यात आलेली दखल यावरही प्रकाश टाकला. अपर जिल्हाधिकारी श्री. महिंद्रीकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. व-हाडे यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात रांगोळी स्पर्धेत प्रथम आलेला पराग हेडाऊ, द्वितीय प्रियंका राठोड, तृतीय संजय रणखांब तर श्याम चौधरी आणि प्रेम जयसिंगकार यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. वादविवाद स्पर्धेत प्रथम प्रदीप दगडेलवार, द्वितीय पुजा खैरकार, तृतीय जयेश पवार, निबंध स्पर्धेत प्रथम ज्ञानेश्वरी कचवे, द्वितीय संबोधी जाधव, तृतीय राशी अमरावत, चित्रकला स्पर्धेत प्रथम रक्षा राठोड, द्वितीय खुशी धवने, तृतीय जागृती अंदूरकर यांचा समावेश होता. तसेच स्वीप जनजागृती मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जयंत चावरे, गजानन गुघाने, वैभव डगवार, प्रमोद मडावी, अमृता खंडेराव, उत्कृष्ट पर्यवेक्षक म्हणून विजय बकाले यांच्यासह उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांचासुध्दा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मतदार जनजागृतीबाबत शहरातून रॅली काढून कलापथकाद्वारे सादरीकरण करण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. संचालन विद्या चिंचोरे यांनी तर आभार तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी मानले. कार्यक्रमाला सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेश चिंचोरे, नायब तहसीलदार रुपाली बेहेरे, निवडणूक विभागातील प्रमोद बाकडे, दिलीप कडासने, प्रवीण घोडे, मिलींद बोरकर, योगेश भावी, संजय बोरलेवार यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी