पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा




v 19 जानेवारीला बालकांना लस देण्याचे आवाहन
यवतमाळ दि. 04 : संपूर्ण जिल्ह्यात 19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण मोहिमेबाबत जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीला मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस.ढोले, डॉ. प्रशांत पवार, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. पियुष चव्हाण, आयएमए यवतमाळ शाखेचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी, बालरोग तज्ज्ञ डॉ. विरेंद्र राठोड आदी उपस्थित होते.
0 ते 5 वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शासकीय यंत्रणेसोबतच इंडियन मेडीकल असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या विविध सामाजिक संघटनांची मदत आरोग्य विभागाने घ्यावी. तसेच एका वर्षात जे नवीन बालके जन्माला आली आहेत, अशा कुटुंबावर लक्ष केंद्रीत करावे. आरोग्य विभागाने मोहिमेबाबत गांभिर्याने जनजागृती करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.
जिल्हयात 2352 ग्रामीण  व 285 शहरी असे एकूण 2637 बुथच्या माध्यमातून  मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 303 ट्रांझिट टिम आणि 127 मोबाईल टिमव्दारे जिल्हयातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 251516 अपेक्षित बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. यात ग्रामीण भागातील 194217 व शहरी भागातील 57299 बालकांचा समावेश आहे. ज्या बालकांना काही कारणास्तव पोलिओ बुथवर पल्स पोलिओ लस पाजण्यात आली नाही, अशा बालकांना गृहभेटीव्दारे कर्मचा-यामार्फत शोध घेवून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे.
जिल्हयातील गाव वाडी, पोड, पाडा, तांडा, मळा, यात्रा, बाजार, बस थांबा तसेच प्रवासातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख यांना पर्यवेक्षणासाठी तालुके वाटप करण्यात आले आहेत. लसीकरणाच्या दिवशी बुथ व विटभटया, उसतोड कामगार वसाहत, मेंढपाळ, पोड, पाडे, तांडे व शहरी झोपडपटटया आदी भागांना भेटी देवून पोलिओच्या लसीकरणापासून 5 वर्षांच्या आतील बालके सुटणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हास्तरीय दक्षता समितीत सर्व यंत्रणेला निर्देश दिले आहे. या मोहिमेमध्ये बायव्हॅलन्ट लसीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामळे 0 ते 5 वर्षे वयोगटातील आपले बालक या लसीपासून वंचित राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. बाळ नुकतेच जन्मले असले तरीसुध्दा किंवा यापूर्वी लस दिली असली किंवा बाळ आजारी असले तरीही लस देणे गरजेचे आहे, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी