यवतमाळ तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज
*1 लाख मतदार बजावणार हक्क
*4 आचार संहिता पथक स्थापन
*120 मतदान केंद्रांची निश्चिती
यवतमाळ, दि. 27 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 120 मतदान केंद्रे राहणार आहे. ही निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी 11 जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आजपासून दि. 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे. नामनिर्देशन आणि शपथपत्राच्या नमुन्यासाठी panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून त्याची प्रिंट विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावयाची आहे. नामनिर्देशन पत्रे स्विकारण्याची अंतिम मुदत 1 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तसेच याच दिवशी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी 10 वाजल्यापासून शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहिर करण्यात येतील.
यवतमाळ तालुक्यात 1 लाख 680 मतदार असून यात 52 हजार 261 पुरूष आणि 48 हजार 415 महिला आणि चार इतर मतदार आहेत. मतदानासाठी 88 ग्रामपंचायतीमध्ये 120 मतदान केंद्र राहणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 ते 1400 मतदार याप्रमाणे मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. आचारसंहितचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी चार आचारसंहिता पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकात चार कर्मचारी राहणार आहे. तसेच व्हीडीओग्राफी सर्व्हेलियन्सचे चार पथक तयार करण्यात आले असून यात चार कर्मचारी, एक पीएसआय, एएसआय दर्जाचे अधिकारी राहणार आहे. निवडणुकीसाठी व्हीडीओ शुटींग तसेच तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 07232-244265 हा असून नागीकांना त्यांच्या तक्रारी, आचारसंहिता भंग केल्याबाबतची माहिती देऊ शकतील.
यवतमाळ तालुक्यातील चारही बाजुला मुख्य रस्त्यांवर पाच चेकपोस्ट लावण्यात आले आहे. या माध्यमातून रोख पैसा, दारू, निवडणूक प्रचार साहित्य, अवैध शस्त्रांची वाहतूक आदी बाबींवर निवडणूक कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांमार्फत अहोरात्र पाळत ठेवली जाणार आहे. निवडणुकीसाठी लागणारे वाहन, कार्यालय, फ्लेक्स बॅनर, सभा, लाऊडस्पीकर, मिरवणूक, मैदान ना हरकरत परवाने मिळविण्यासाठी एक खिडकी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी राहणार आहे. यातून उमेदवारांना त्यांच्यासाठीचे परवाने सुलभरित्या मिळणार आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरण्यापूर्वी राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेत खाते उघडणे बंधनकारक असून नामनिर्देशन पत्रासोबत त्या पासबुकची झेरॉक्स जोडावी लागणार आहे. निवडणुकीसाठी पंचायत समितीचे अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली हेल्पडेस्क स्थापन करण्यात आला आहे. हेल्प डेस्कचा दूरध्वनी क्रमांक 07232-244286 याठिकाणी तालुक्यातील निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि निवडणुकीशी संबंधित इतर बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचठिकाणी उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
केरोसीनचे जानेवारी महिन्यासाठी नियतन मंजूर
यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी जानेवारी महिन्याचे केरोसीन 50 टक्के द्वारवितरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यातील 468 केएल केरोसीन पैकी 456 केएल केरोसीन द्वारवितरण प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणार आहे.
केरोसीनचे वितरण सरळ किरकोळ केरोसीन परवानाधारकांना कंपनीकडील एजंटामार्फत तालुकास्तरावर द्वारवितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार घाऊक, अर्धघाऊक केरोसीन एजंटांना 25 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने केरोसीनची उचल करावी लागणार आहे. या वाटप केलेल्या केरोसीनची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी लागणार आहे.
00000
राज्यातील सात लोकसमूहांना अल्पसंख्यांक दर्जा
यवतमाळ, दि. 21 : राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारशी), जैन आणि ज्यू या सात लोकसमूहांना अल्पसंख्यांक लोकसमूह म्हणून दर्जा दिला आहे.
राज्यातील या सात लोकसमूहांना अल्पसंख्यांक लोकसमूह असा दर्जा असल्याची पुरेशी माहिती संबंधित लोकसमूहातील नागरीकाना नाही. तसेच त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहे. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
1 फेब्रुवारी रोजी 70 रेतीघाटासाठी बैठक
यवतमाळ, दि. 27: जिल्ह्यातील सन 2016-17 साठी 45 रेतीघाटासाठी मुळ सरकारी किंमतीमध्ये 25 टक्के रक्कम कमी करून 20 जानेवारी रोजी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यानंतर शिल्लक राहिलेल्या 39 आणि कंत्राटदारांच्या बैठकीनंतर शिल्लक राहिलेल्या 31 रेतीघाटासाठी देकार देण्यासाठी बुधवारी, दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीला शासकीय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तसेच रेतीघाट घेण्यास इच्छुक असलेल्या अहर्ताप्राप्त कंत्राटदारांनी बैठकीला उपस्थित राहावे. या 70 रेतीघाटांची माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी आणि तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे.
00000
  अडीच लाख बालकांना रविवारी पोलिओ लस
*जिल्ह्यात 2 हजार 637 बुथ
*नागरीकांनी मोहिमेत सहभाग नोंदवावा
यवतमाळ, दि. 27 : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 51 हजार 516 बालकांना पोलिओचा पहिला डोज पाजण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण 2 हजार 352 आणि शहरी 285 असे एकूण 2 हजार 637 बुथ, तसेच ग्रामीण 215 आणि शहरी 88 अशा एकूण 303 ट्रॉझिट टीम आणि 117 ग्रामीण आणि 10 शहरी मोबाईल टीमद्वारे शुन्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहे. यात 1 लाख 94 हजार 217 ग्रामीण आणि 57 हजार 299 शहरी बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहे. बुथवरून पोलिओ लस पाजण्यास सुटलेल्या बालकांचा शोध गृहभेटीद्वारे घेऊन त्यांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. या लसीकरणात एकही बाल सुटू नये, यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या विभागप्रमुखांना पर्यवेक्षणासाठी तालुके वाटप करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत सर्वच ठिकाणच्या बालकांचा शोध घेऊन पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. यातून एकही बालक सुटू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
या मोहिमेमध्ये बायव्हॅलन्ट लसीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांच्या पालकांना आपल्या बालकांना ही लस पाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पल्स पोलिओ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून नागरीकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी केले आहे.
पोलिओ मोहिमेच्या प्रचारासाठी 25 जानेवारीपासून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच जिल्हास्तरावर विविध सामाजिक संघटना, नर्सिंगचे विद्यार्थी, समाज कार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या सहभागातून रॅली काढण्यात आली.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी