भारतीय राज्यघटनेमुळेच देश एकसंघ
 -पालकमंत्री मदन येरावार
*पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम
*प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा
*देशाची राज्यघटना जगात सर्वात प्रगल्भ
यवतमाळ दि. 26 : विविध जाती, धर्म, पंथांचा हा देश असूनही केवळ भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या लोकशाहीने देशबांधवांत विश्वास आणि आत्मियता निर्माण केली आहे. यामुळेच देशाचे अखंडत्व प्रत्येक भारतीयासाठी भुषणावह आहे. आज जगात सर्वात मोठी आणि निकोप लोकशाही म्हणून भारताचा गौरव होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
येथील पोस्टल मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने पालकमंत्री श्री. येरावार यांनी जनतेस संदेश दिला. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. येरावार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांना प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या विकासासाठी इतिहासातील देशाचे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक पद्धतीचा मोलाचा वाटा आहे. राज्यघटनेच्या स्विकारामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरूद भारताला मिळाले आहे. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने लोकशाही प्रस्थापित होऊन संपूर्ण जगातील एक प्रगल्भ लोकशाही म्हणून भारताचे नाव घेतले जाते. देशात लोकशाही असल्यामुळे राज्याने सर्वच क्षेत्रात विकास केला आहे. संपुर्ण देशात प्रगती साधणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा प्रामुख्याने उल्लेख होतो. देशाच्या आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील प्रगतीमध्ये राज्य केंद्रस्थानी आहे. यापुढेही राज्य अग्रक्रम कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर विविध पथकांच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस, वन, होमगार्ड, स्काऊट गाईड आदींच्या वतीने सुरेख पथसंचलन करण्यात आले. जलदगती प्रतिसाद पथकाने दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक केले. त्यांनतर स्कुल ऑफ स्कॉलर्स-सेव्ह वॉटर, महिला विद्यालय-फ्लॅग ड्रील, श्री शिवाजी विद्यालय-सर्जिकल स्ट्राईक, राणी लक्ष्मीबाई विद्यालय-अम्ब्रेला ड्रील, अभ्यंकर कन्या शाळा-लेझीम, जायन्टस ईंग्लिश स्कुल-क्लॉथ ड्रील, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय-छत्तीसगडी लोकनृत्य, ॲग्लो हिंदी हायस्कुल-मल्लखांब, रोप मल्लखांब, रोप स्किपींग सादर केले. यासाठी किशोर चौधरी, उपशिक्षणाधिकारी ए. पी. रोहणे, मनोज येंडे, अविनाश जोशी, जितेंद्र सातपुते, राहुल ढोणे यांनी सहकार्य केले. चंद्रबोधी घायवाटे आणि ललिता जतकर यांनी सूत्रसंचालन केले.
पालकमंत्र्यांनी स्विकारली चिमुकल्यांची मानवंदना
आजच्या पथसंचलनात स्कुल ऑफ स्कॉलर्सच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व मुख्य पथसंचलन पथकांची मानवंदना झाल्यानंतर स्कुल ऑफ स्कॉलर्सच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. त्यांचे सुरेख पथसंचलन पाहून पालकमंत्री मदन येरावार यांनी उस्त्फुर्तपणे डायसच्या खाली येऊन मानवंदना स्विकारली. पालकमंत्र्यांच्या या कृतीला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी