कर्नल सुधिर सिंह यांचा सन्‍मान
*जिल्‍हाधिकाऱ्यांकडून स्‍मृतीचिन्‍ह प्रदान
यवतमाळदि. 18 : दहा वर्षानंतर प्रथमच जिल्‍हयात भारतीय संरक्षण विभागाकडून सैन्‍य भरती राबविण्‍यात आली. याबद्दल जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी डायरेक्‍टरेट जनरल ऑफ रीक्रुटिंग सुधिर सिंह (नागपूर) यांचा बळीराजा चेतना अभियानाचे स्‍मृतीचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. यावेळी मुख्‍यकार्यकारी अधिकारी दीपक सिंगलानिवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.           
भारतीय सेनेकडून जिल्हा क्रीडा संकुलात ६ ते १७ जानेवारी २०१७ दरम्यान विदर्भातील युवकांसाठी सैन्य भरती आयोजित करण्‍यात आली होती. या भरतीत यवतमाळ जिल्‍हयातील आठ हजार ८०० युवकांनी सहभाग नोंदविला. उर्वरित जिल्‍हयातून ४४ हजार युवकांनी सैन्‍य भरतीत सहभाग नोंदविला. अशा एकूण ५२ हजार ८०० युवकांनी सैन्‍य भरतीत सहभाग घेतला होता. जिल्‍हयात एक गाव, एक सैनिक ही मोहिम हाती घेण्‍यात आली होती. या भरतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकरी पूत्रांना व्‍हावा. यासाठी शेतकरी पूत्रांनी या सैन्‍य भरतीमध्‍ये सहभागी व्‍हावे, यासाठी सैन्‍य भरतीची  माहिती शेतकरी पूत्रांना होण्यासाठी व्यापक मोहिमही बळीराजा चेतना अभियानांतर्गत हाती घेण्यात आली होती. प्रत्‍येक गावातून शेतकरी पूत्र व युवकांची भरतीत निवड व्‍हावी, असे उद्द‍िष्‍ट जिल्‍हा प्रशासनाने समोर ठेवले आहे.
शेतकरी पूत्रांना रोजगार प्राप्‍त करून देणेत्‍यांच्‍या जीवनात स्‍थैर्य आणने हे देखील बळीराजा चेतना अभियानाचे उद्द‍िष्‍ट होते. जिल्‍हयात झालेल्‍या सैन्‍य भरतीत शेतकरी पुत्रांकरिता आणि जिल्‍हयातील सर्व युवकांकरिता फार मोठी रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्‍ध झाली होती. त्‍यामुळे  सरंक्षण विभागाकडून जिल्‍हयात राबविण्‍यात आलेल्‍या सैन्‍य भरतीबद्दल जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी भरतीसाठी आलेल्‍या भारतीय सेनेचे अधिकारीकर्मचारी यांना बळीराजा चेतना अभियानाचे स्‍मृतीचिन्‍ह देऊन सन्‍मान करण्‍यात आला. तसेच जिल्‍हयात राबविण्‍यात आलेल्‍या सैन्‍य भरती बद्दल भारतीय सेनेचे आभार मानले.
00000
वृत्त क्र60
सहा तालुक्यात तूरीची आधारभूत किंमतीने खरेदी
यवतमाळ, दि. 18 : नाफेडतर्फे जिल्ह्यात सहा ठिकाणी आधारभूत किंमतीने तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पुसद, कळंब, उमरखेड, दिग्रस, वणी, आणि पांढरकवडा येथे आधारभूत किंमतीने तूर खरेदी करण्यात येत आहे. तूरीसाठी चार हजार 625 आधारभूत दर आणि बोनस 425 रूपये अशा पाच हजार 50 रूपये प्रतिक्विंटल दराने दररोज ही खरेदी सुरू आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या मालाची प्रतवारी करून आणावी. मालाची चाळणी करावी, तूरीमध्ये 12 टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी, माल पूर्णपणे सुकवून, वाळवून केंद्रावर आणावा, माल खरेदी केंद्रावर आणताना सातबाराचा उतारा सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी
शाखा अधिकारी नाफेड (022-26465304), पणन सरव्यवस्थापक अनिल देशमुख (022-23752294/98), अन्नधान्य उपव्यवस्थापक के. बी. तोटे (8424045116), जिल्हा मार्केटींग अधिकारी व्ही. एस. ठाकरे (8108182954) अथवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र61
कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बँक खात्यात
*रोख स्वरूपात देणार लाभ
यवतमाळ, दि. 18 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वस्तू स्वरूपात देण्यात येत होता. आता हा लाभ लाभार्थ्यांला रोख स्वरूपात देण्यात येणार असून त्याच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
शासनाने याबाबत 5 डिसेंबर 2016 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे यापुढे विविध कल्याणकारी योजनांमध्ये ज्या ठिकाणी शासनाद्वारे वस्तू स्वरूपात अनुदान देण्यात येत आहे, त्याठिकाणी वस्तू स्वरूपात अनुदान देण्याऐवजी रोख रकमेच्या स्वरूपात अनुदान दिल्यास लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे.
00000
वृत्त क्र. 62
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू
*प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता काढणार
यवतमाळ, दि. 18 : शिक्षण हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमानुसार 2017-18 या सत्रात दुर्बल आणि वंचित घटकासाठी 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी शाळा नोंदणी16 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पालकांना 5 ते 21 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.
आरटीई अंतर्गत शाळा नोंदणी 16 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, पालकांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 5 ते 21 फेब्रुवारी, पहिली लॉटरी 28 आणि 28 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. विहित मुदती पालकांनी शाळैत जाऊन प्रवेश घेण्यासाठी 1 मार्च ते 9 मार्च, उर्वरीत रिक्त जागा दर्शविण्यासाठी 10 ते 11 मार्चचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या सोडतीमधील प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या उर्वरीत विद्यार्थ्यांकरीता 14 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत चार सोडती काढण्यात येतील.
मागील वर्षी जिल्ह्यात 179 शाळांनी 1860 जागांसाठी नोंदणी केली होती. यात 880 जागांवर प्रवेश देण्यात आला. यावर्षी प्रवेशपात्र शाळांची संख्या वाढल्यामुळे प्रवेशपात्र जागांची संख्या वाढणार आहे. पात्र असूनही ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, तसेच सोडतीद्वारे निवड झाल्यानंतरही ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
शाळा नोंदणीनंतर पालकांना student.maharashtra.gov.in/admportal/Users/rteindex या वेबसाईटवर 21 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करताना गुगल मॅपिंगवरील घराचे स्थान निश्चित केल्यानंतर त्यांना एक ते तीन किलोमीटरवरील प्रवेशपात्र शाळांची यादी दिसेल. यातील एका किंवा सर्वच शाळांसाठी अर्ज करता येतील. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करताना पालकांनी मोबाई क्रमांक देणे आवश्यक आहे. या क्रमांकावरच लॉटरीचा दिनांक, निवड झालेल्या शाळेचे नाव, प्रवेशाचा कालावधी आदी माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर संगणक प्रणालीमार्फत शाळानिहाय सोडत काढून प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याची निवड एकापेक्षा अधिक शाळेसाठी झालेली असल्यास त्याला विहित मुदतीत प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेश घेतलेला नसल्या त्याला पुढच्या फेरीतून बाद करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश घेतलेली शाळा बदलवून मिळणार नाही.
वंचित घटकासाठी अर्ज करताना पालकांनी जातीचा दाखला, रहिवासी पुरावा, बालकाचा जन्माचा दाखला, असल्यास अपंगत्वाचा पुरवा, बालकाचा पासपोर्ट वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. दुर्बल घटकासाठी अर्ज करताना एक लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय व धार्मिक अल्पसंख्याकासह इतर बालकांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासाचा दाखला, बालकाचा जन्माचा दाखला, बालकाचा पासपोर्ट आवश्यक आहे. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 63
बॅकेशी आधारकार्ड लिंकच्या पावत्या सादर कराव्यात
यवतमाळ, दि. 18 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेसाठी प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षापर्यंतच्या योजनेतील अर्ज मंजुरीसाठी आधारकार्ड बँकेशी लिंक केल्याबाबतच्या पावत्यांची छायांकित प्रत सादर करावे लागणार आहे. या पावत्या समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या कार्यालयात 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सादर कराव्या लागणार आहे. या पावत्या अभावी शिष्यवृत्ती, शिक्षण फी,  परिक्षा फी पासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 64
वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी वेळ निश्चिती
यवतमाळ, दि. 18 : उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांसाठी कालावधी आणि वेळ निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी तारीख संपण्यापूर्वी वाहन कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
वाहन तपासणीसाठी प्रत्येक संवर्गातील वाहनाची तपासणी करण्यास किमान वेळ देणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहन कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबतचे कागदपत्र, योग्यता प्रमाणपत्राची विधीग्राह्यता संपण्यापूर्वी कार्यालयात एक दिवस अगोदर जमा करून त्याची पोच घ्यावी. तसेच दुसऱ्या दिवशी वाहन कार्यालयात सादर करण्याची वेळ निश्चित करून घ्यावी. त्यानंतर वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाची ठरलेल्या दिवशी तपासणी करण्यात येईल. यामुळे वाहनाच्या योग्यता प्रमाणप्‍ नुतनीकरणासाठी होणाऱ्या कामकाजास दिरंगाई व अडचण निर्माण होणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 65
हरित सेना शिक्षक कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद
यवतमाळ, दि. 18 : राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत 250 इको क्लब शाळांतील प्रभारी शिक्षकांची कार्यशाळा शनिवारी, दि. 13 जानेवारी रोजी पार पडली. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक यांच्या कार्यालयात ही कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत अमरावती येथील वनराईचे अध्यक्ष मधुकर घारड यांनी राष्ट्रीय हरित सेना राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जैवविविधता स्थापना व कार्य याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर अशोक पोले, डॉ. नितीन खर्चे, श्याम जोशी यांनी हरित सेनेच्या स्थापनेमागील उद्देश, पर्यावरण विषयक बाबी, वन्यप्राण्यांचे मानवी जीवनातील महत्त्व, स्वच्छता अभियान, प्लॉस्टीक निर्मुलन आदीबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक एम. आर. चेके यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॅलो फॉरेस्ट या 1926 टोल फ्री क्रमांकावरील उपलब्ध असलेली माहिती सांगितली. शाळेमध्ये वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड व संरक्षण हाच एक पर्याय या वाक्याने पर्यावरण विष्यक जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यशाळेसाठी सहायक संचालक जी. आर. राठोड, लागवड अधिकारी एम. बी. गवळी, ए. व्ही. झळके, डी. पी. होले, श्री. खडसे, सर्व्हेअर श्री. आडे, श्री. गेडाम, श्री. इंगळे, श्री. खोब्रागडे, शंकर राऊत, श्री. पांडे, श्री. फुलझेले, श्री. उंबरकर, श्री. चिरडे यांनी पुढाकार घेतला.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी