उमेदवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर लावणार
-राज्य निवडणूक आयुक्त जे. एस­. सहारिया
*पात्र नोंदणीकृत पक्षांना समान चिन्ह मिळणार
*उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे सक्तीचे
यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उमेदवारांनी शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीचा गोषवारा फ्लेक्सद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर स्वरूप सहारिया यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, निवडणूक सचिव शेखर चन्ने, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
सुरवातीला निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी जिल्ह्यातील निवडणुकीसंदर्भात माहिती जाणून घेतली. निवडणुकीअनुषंगाने उमेदवारांनी भरावयाची ऑनलाईन अर्ज, शपथपत्र आदींबाबत माहिती मोठ्या प्रमाणावर संबंधितांना अवगत करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नगर पालिकेच्या निवडणुकीत ऑनलाईन अर्जाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे अर्ज फेटाळण्याचे प्रकार कमी झाले आहे. निवडणुकीच्या अनुषांगाने आवश्यक असलेल्या सर्व समित्या स्थापन करण्यात आली आहे. भरारी पथकांची निर्मिती करण्यात आले असून येत्या काळात या सर्वांचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू होणार आहे. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशिल भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यात येणार असून निवडणुका पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
या निवडणुकीच्या अनुषांगाने काही महत्त्वाचे पावले निवडणूक आयोगाने उचलली आहे. यामध्ये उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच एबी फॉर्म द्यावे लागतील. त्यासोबतच उमेदवारांनी शपथपत्रात दिलेली संपत्ती आणि गुन्ह्यांच्या माहितीचा गोषवारा प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लावण्यात येतील. निवडणुकीसंदर्भात नागरीकांना तक्रारी करावयाच्या असल्यास त्यासाठी कॉप ॲप हे ॲप तयार करण्यात आले आहे. यातून केलेल्या तक्रारी थेट पोहोचण्यास मदत होईल. निवडणुकांमध्ये नोंदणीकृत पक्षांना समान चिन्ह मिळण्यासाठी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तीन दिवस अगोदर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. पंचायत समितीमध्ये पाच टक्के किंवा एक उमेदवार निवडून आलेला असल्यास चिन्ह आरक्षित करून त्यांना समान चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मद्य, पैसा किंवा वस्तूंचा वापर मतदारांना देण्यासाठी होणार नाही, यासाठी बँक, आयकर अधिकारी यांचीही मदत घेण्यात येणार आहे. धर्म, जातीच्या आधारे मतदान मागता येणार नाही. तसेच धार्मिक स्थळांचा वापर करता येणार नाही. अशा प्रकारची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येत असून पालिका क्षेत्रातील पोस्टरही तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 84 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक पुर्णत: निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याचे श्री. सहारिया यांनी सांगितले.
00000


निवडणुका निर्भय वातावरणात पार पडणार
-विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता
*निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा
*अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात पदवीधर आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येत आहे. या निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आली आहे. यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून या दोन्ही निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडतील, अशी माहिती विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे निवडणुकीशी संबंधित यंत्रणेची त्यांनी बैठक घेतली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यातील काही भाग निवडणुकीच्या दृष्टीने संवेदनशिल आहे. त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रामुख्याने पालिका क्षेत्रातील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आता ग्रामीण भागात प्रचार करतील. त्यांच्या उपस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकेल, अशांवर आतापासून प्रतिबंधात्मक कारवाई करावी. निवडणुकांमध्ये अवैध मार्गाचा अवंलब होऊ शकत असल्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रामुख्याने शासन ज्या उपाययोजना करते, त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार उमेदवारांकडून होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस, जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणेने सतर्कतेने काम करण्याची गरज आहे.
निवडणुकांमध्ये पैसा आणि मद्याच्या वापरासोबचत धार्मिक कारणावरून सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे धार्मिक स्थळांवर लक्ष केंद्रीत करावे. पैसा ज्या ठिकाणाहून प्रामुख्याने शहरी भागातून जात असल्याने त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या साधनांवर लक्ष केंद्रीत करावे. कायद्याचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने निवडणूक यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी. पदवीधरची निवडणूक ही पारंपरीक पद्धतीने बॅलेट पेपर वापरून होणार असून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ईव्हीएम मशिनवर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी स्थानिक निरीक्षण महत्त्वाचे असून सर्व यंत्रणांनी सक्षमपणे कार्य करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यामुळे वेळेवर धावपळ थांबविण्यासाठी उमेदवारांनी आधीच अर्ज करावेत, उमेदवार ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी मदत केंद्र स्थापन करावे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशिक्षण देणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. आयोगाने दिलेले शपथपत्र त्याला सादर करावे लागणार आहे. तसेच उमदेवारांची माहिती मतदानकेंद्राबाहेर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नोंदणीकृत पक्षांना समान चिन्ह वाटप करण्याची प्रकिया उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर करावयाची आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा अभ्यास ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक आहे. त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामी मदत घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सूचविले.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी