वैद्यकीय चाचणीत उत्तीर्णांसाठी मार्गदर्शन
*सैन्य भरतीसाठी लेखी परीक्षेचे मार्गदर्शन
*30 जानेवारी रोजी पुन्हा मार्गदर्शन
यवतमाळ दि. 23 : यवतमाळ येथे झालेल्या सैन्य भरतीमध्ये वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेचे मार्गदर्शन 21 जानेवारी रोजी करण्यात आले. या मार्गदर्शनात सहभागी होऊ शकले नाहीत, अशा उमेदवारांसाठी पुन्हा सोमवारी, 30 जानेवारी रोजी  मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
येथील जिल्हा क्रीडा संकुलात 6 आणि 7 जानेवारी रोजी सैन्य भरती झाली आहे. यात मैदानी आणि वैद्यकीय चाचण्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या परीक्षेबाबत यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांकरीता मार्गदर्शनासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ येथे सोमवारी, दि. 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या आणि तात्पुरते अपात्र झालेल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 7875087902 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी केले आहे.
00000
पदुम संस्थांनी दोष दुरूस्ती अहवाल सादर करावेत
यवतमाळ दि. 23 : जिल्ह्यातील पदुम सहकारी संस्थांचे वैधानिक लेखापरीक्षण पुर्ण झाले आहे. संस्थांनी प्राप्‍त वैधानिक लेखापरीक्षण अहवालातील नमूद संपूर्ण दोषांची परिपुर्ण पुर्तता, दुरूस्ती करून दोष दुरूस्ती अहवाल तीन महिन्यांच्या आत संबंधित लेखा परीक्षकांना सादर करणे आवश्यक आहे.
पदुम सहकारी संस्थांचे 2014-15 आणि 2015-16चे लेखा परीक्षण पुर्ण झाले आहे. ज्या संस्थांनी अद्यापपर्यंत लेखा परीक्षण अहवावालाचा दोष दुरूस्ती अहवाल सादर केलेला नाही, त्यांनी तो तात्काळ सादर करण्याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन केल्यास सर्व सदस्यांनी अपराध केला असल्याचे मानून पाच हजार रूपयांपर्यंत दंडाची शिक्षा करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित लेखा परीक्षकांनी तयार करून सहायक निबंधक, सहकारी संस्था दुग्ध, यांच्याकडे सादर करावेत.
लेखा परीक्षण करणाऱ्या संबंधित लेखा परीक्षकांनी कार्यवाही करण्यात कसूर केल्याचे आढळल्यास त्यांचे नाव लेखा परीक्षक नामतालिकेतून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यायलास सादर करण्यात येईल. याची संबंधित लेखा परीक्षकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 2, सहकारी संस्था पदुम, यांनी केले आहे.
00000
अवैध सावकारीतील जमीन शेतकऱ्यांना परत
*दोन सावकारांविरूद्ध गुन्हा दाखल
*माहिती सादर करण्याचे आवाहन
यवतमाळ दि. 23 : जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी सावकाराने शेतजमीन हडप केल्याच्या तक्रारी दाखल केल्यानंतर त्याची तपासणी करून अवैध सावकाराच्या ताब्यातील जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. यात दोन अवैध सावकारांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध सावकारीवर अंकुश ठेवण्यासाठी या प्रकाराची माहिती नागरीकांनी सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अवैध सावकारीवर नियंत्रण आणि शेतकऱ्यांची सावकारी जाचातून मुक्तता करण्यासाठी सावकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. यात सरीता महादेव धोटे आणि दारासिंग जयराम चव्हाण यांनी अवैध सावकारीत हडप केलेली जमीन परत मिळणेबाबत तक्रार सावकाराचे निबंधक यांच्याकडे दाखल केली. या दोन्ही प्रकरणांची चौकशी करून हडप केलेली जमीन तक्रारकर्त्यांना परत करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सावकारांचे जिल्हा निबंधक गौतम वर्धन यांनी अवैध सावकारी सिद्ध झाल्यामुळे दारव्हा येथील सहाय्यक आयुक्त यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 20 जानेवारी रोजी दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. यात खोपडी मिरासे, ता. दारव्हा येथील अर्जदार दारासिंग चव्हाण याची शेतजमीन परत करण्याचे आदेश देऊन अवैध सावकार धनराज डांगरा, रा. दारव्हा आणि राजेश किसन राठोड, रा. खोपडी या दोघांविरूद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सरीता महादेव धोटे, रा. ईरथळ, ता. दारव्हा यांनी लिलाबाई राठोड यांचे मृत्यू झालेले पती यांनी शेतजमीन हडप केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी शेती परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात रविंद्र राठोड आणि रोहिदास राठोड, रा. ईरथळ यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल करण्यासाठी सहकारी अधिकारी ए. आर. बांते, मुख्य लिपिक एन. डी. नाईक यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन आणि सहाकय निबंधक प्रेम राठोड यांनी केली होती.
00000
मतदानासाठी चालणार सतरा प्रकारचे ओळखपत्र
*अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
यवतमाळ, दि. २३ : अमरावती विभाग पदविधर मतदारसंघाच्‍या ३ फेब्रुवारीला होणा-या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतदारांना १७ प्रकारचे ओळखपत्र मतदाराला आपली ओळख म्‍हणून वापरता येणार आहे. १७ पैकी कुठलेही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर मतदारांनी सोबत आणावे, असे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.  
             अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणुकिसाठी यवतमाळ जिल्‍हयातील ४८ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांसाठी ओळख म्‍हणून निवडणूक आयोगाकडून १७ प्रकारचे ओळखपत्र घोषीत करण्‍यात आले आहे. यामध्‍ये १)पासपोर्ट, २)वाहन चालविण्‍याचा परवाना, )आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, ४)केंद्र शासन, राज्‍य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांनी आपल्‍या कर्मचा-यांना फोटोसहित दिलेले ओळखपत्रे, ५)राष्‍ट्रीय बॅंका अथवा पोस्‍ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, ६)स्‍वातंत्र सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, ७) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत सक्षम प्राधिका-याने अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्ग/विमुक्‍तजाती/भटक्‍या जमाती /विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्‍यादिंना फोटोसहित दिलेले प्रमाणपत्र, ८) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत सक्षम प्राधिका-याने दिलेला फोटोसहित अपंगत्‍वाचा दाखला, ९) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत फोटोसहित देण्‍यात आलेल्‍या शस्‍त्रास्‍त्राचा परवाना, १०) मालमत्‍तेबाबतची कादपत्रे तसेच नोंदणी खत इत्‍यादी (फोटोसहित), ११) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत दिलेले राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र, १२)निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत दिलेले निवृत्‍त कर्मचा-यांचे फोटो असलेले पासबुक, १३) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत दिलेले निवृत्‍त कर्मचा-यांच्‍या विधवा, अवलंबिता व्‍यक्‍ती यांचे, फोटो असलेले प्रमाणपत्र, १४) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत दिलेले वयस्‍कर निवृत्‍ती वेतनधारक अथवा विधवा यांचे, फोटो असलेले फोटो प्रमाणपत्र, १५)केंद्र शासनाच्‍या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्‍य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, १६) निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍याच्‍या आधीच्‍या तारखेपर्यंत दिलेली शिधापत्रिका (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्‍यासाठी एकत्र येणे आवश्‍यक असेल. तसेच जर शिधापत्रिकेवर एकाच व्‍यक्‍तीचे नाव असल्‍यास त्‍याने स्‍वतःच्‍या वास्‍तव्‍याचा अन्‍य पुरावा जसे वीज वापराचे देयक, दूरध्‍वनी वापराचे देयक प्रॉपर्टी कार्ड किंवा घरपट्टी भरल्‍याची पावती सोबत आणणे बंधनकारक राहिल.), १७)आधार ओळखपत्र यांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.
त्‍यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानाला जातेवेळी यातील एक ओळखपत्र म्‍हणून सोबत आणावे. असे आवाहन अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी सचिन्‍द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. तसेच यावेळी निवडणुकीत मतदारांच्‍या उजव्‍या हाताच्‍या तर्जनीवर मतदान केल्‍याची शाई लावण्‍यात येणार आहे.
00000
पदवीधर मतदानासाठी 48 बीएलओ
यवतमाळ दि. 23 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासाठी 48 केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमण्यात आली आहे. हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांना मदत करणार आहेत.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदारांची यादी पुरविण्यात येणार आहे. यामुळे ते मतदान केंद्र निहाय मतदारांची तपासणी करू शकतील. तसेच 1 फेब्रुवारीपर्यंत उपविभागीय, तहसिल, आणि मंडळस्तरावर शिबिर आयोजित करून यादीतून मतदारांचे नाव, अनुक्रमांक, मतदान केंद्र, शोधण्यास मदत होईल. तसेच 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्राबाहेर टेबल, खुर्ची लावून मतदान केंद्राच्या यादीसह बसतील. याठिकाणी आलेल्या मतदारांचे नाव, नंबर शोधणे आणि चिठ्ठी देण्यास मदत करतील. प्रशासनाने केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मोबाईलही प्रकाशित केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी