मतदानात प्रत्येक समस्येचे उत्तर
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त विविध उपक्रम
*स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार देऊन गौरव
यवतमाळ दि. 25 : भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरीकास विविध अधिकार दिले आहे. हे सर्व अधिकार समानतेने दिले आहे. यात सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक समस्येचे उत्तर हे मतदानात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, नुकत्याच तामीळनाडूमधील जलीकट्टू आंदोलनामुळे नागरीकांचा दबाव किती असू शकतो. जलीकट्टू हा मुलभूत प्रश्न नव्हता तरीही त्या राज्याला तात्काळ कायदा अंमलात आणावा लागला. मात्र मतदान हा घटनादत्त अधिकार आहे. केवळ मतदानानेच आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असून आपल्याला पाहिजे तसे कायदे करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांपैकी उत्तम उमेदवार निवडणे हा पर्याय आपल्या समोर आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख मतदारांची नोंदणी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी अभियान राबवावे लागणार आहे.
देशात भावनात्मक मुद्दावर मतदान होते, तसेच जाती, धर्म आणि प्रलोभनाने मतदान करण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर केवळ युवा मतदारच प्रभावी ठरणार आहे. युवकांनी स्वत:चे व्यक्तीमत्व विकसित करावे, युवकांनी मंथन केल्यास तो स्वस्थ बसू शकणार नाही. मतदान हे सर्व समस्येवर तोडगा काढण्याचे प्रभावी माध्यम असून युवकांनी यात जागरूकतेने सामिल व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मतदान हे बदल घडविण्यासाठी घटनेने दिलेले संवेधानिक साधन आहे. मतदारांनी मतदान करून त्यांना पाहिजे तसे कायदे करण्याचा दबाव या माध्यमातून केला जाऊ शकतो. निवडणुकीदरम्यान देण्यात येणारी प्रलोभने वाईट आहेत, याबाबत युवकांनी जनजागृती करून निकोप लोकशाहीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यात संजय रणखांबे-प्रथम, पराग हेडाऊ-द्वितीय, पौर्णिमा जाऊळकर-तृतीय, तर प्रोत्साहनपर सूमन धनकवडे, पवन राठोड, वक्तृत्व स्पर्धेतील नयन पेंदोर-प्रथम, पुजा गावंडे-द्वितीय, पल्लवी कांबळे-तृतीय, चित्रकला स्पर्धेतील ईशा आणि दिशा बरडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी युवकांना प्राधिनिधीक स्वरूपात मतदान कार्डचे वाटप करण्यात आले. श्री. शेजाळ यांनी ईव्हीएमवरील मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
निवडणूक उपजिल्हाधिकारी संदिप महाजन यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ लिपिक अतुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. तहसिलदार सचिन शेजाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार राजेश चिंचोरे, वरिष्‍ठ लिपिक प्रमोद बाकडे, प्रविण घोडे, रूपाली बिहाडे यांनी पुढाकार घेतला.
00000

अभ्यास दौऱ्यात कंपोस्ट खत प्रकल्पास भेट
यवतमाळ दि. 25 : परंपरागत कृषि विकास कार्यक्रम योजनेच्या सेंद्रीय शेती अभ्यास दौऱ्यात नेर आणि बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुसद तालुक्यातील वरूड, वेणी येथे भेट दिली. येथील कंपोस्ट खत प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली.
बायोडायनॅमिक  पद्धतीने कंपोस्ट व तरलखत तयार करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणे या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात बाभुळगाव तालुक्यातील गळव्हा, सारफळी, आणि नेर तालुक्यातील कोलुरा येथील सेंद्रीय शेती गटातील शेतकरी सहभागी झाले होते. आत्माचे प्रकल्प संचालक बी. एल. पाटील अभ्यास दौऱ्याला हिरवी झेंडी दाखविली. यात शेतकऱ्यांनी वरूड येथील माधव पडघणे यांचे फळपिक रोपवाटीका, अझोला टँक, कंपोस्ट बेड तसेच वेणी येथील मिनी दालमील, बायोडायनॅमीक कंपोस्ट, तरलखत युनीट, सीपीपी कल्चर, गांडुळ खत, सेंद्रिय हरभरा, गहू प्रक्षेत्र आदी ठिकाणी भेट दिली. अभ्यास दौऱ्याचा समारोप चर्चासत्राने करण्यात आला. यात सेंद्रीय शेती गटाचे गट प्रवर्तक रवींद्र पुंड यांनी सेंद्रीय शेती विषयीचे अनुभव व्यक्त केले. तसेच पुसद तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अविनाश वाघमारे, बाभुळगावचे गजानन घाटे, नेर येथील सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनघा ढोले, गळव्हा येथील भानुदान कोयरे, सारफळी येथील किशोर नागपुरे, जितेंद्र वेळुकर, मैथील औदार्य आदी उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याचे आयोजन तालुका कृषि अधिकारी कार्यालय बाभुळगाव आणि नेर आत्मा यंत्रणेतर्फे करण्यात आले.
00000
11 फेब्रुवारी रोजी लोकअदालतीचे आयोजन
यवतमाळ, दि. 25 : जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे यवतमाळ येथील जिल्‍हा न्‍यायालय तसेच जिल्‍ह्यातील सर्व न्‍यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय व इतर सर्व न्यायालयांमध्‍ये शनिवारी,‍ दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्‍ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संदिपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत घेण्यात येणार आहे.
लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित, तडजोडीस पात्र असलेली दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138नुसार चेक बाऊंसची प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, कामगार विवाद प्रकरणे, भुअर्जन प्रकरणे, वीज, पाणी देयकांसंबंधीत प्रकरणे, वेतन, भत्ते, सेवानिवृत्तीविषयक प्रकरणे, महसूली प्रकरणे आणि तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे.
संबधित पक्षकारांनी आपली प्रकरणे दि. 11 फेब्रुवारी रोजी आयोजित राष्‍ट्रीय लोकअदालतीमध्‍ये ठेवण्‍यासाठी संबंधित न्‍यायालयांशी संपर्क साधावा, तसेच आपली प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन दिवाणी न्‍यायाधीश वरिष्‍ठ स्‍तर आणि जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन आगरकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक यांनी केले आहे. 
00000
पदवीधरसाठी विशेष नैमित्तीक रजा
यवतमाळ, दि. 25 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. यातील मतदारांना मतदान करता यावे, यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे.
मुख्य निवडणुक अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार पदवीधर मतदारसंघतील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना असलेल्या नैमित्तीक रजा व्यतिरिक्त असणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी