विकास अहवालातून विकासाची दिशा ठरणार
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*जिल्हा विकास अहवालाचे सादरीकरण
*जिल्ह्यातील समस्यांवर लक्ष केंद्रीत होणार
यवतमाळ, दि. 31 : यशदाने जिल्ह्यातील विविध भागातून महत्त्वाच्या समस्या आणि त्यावरील उपायोजनांचे सादरीकरण केले आहे. यामुळे जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. यातून सुचविलेल्या उपाययोजनांवर जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यशदातर्फे जिल्हा विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यशदातर्फे जिल्ह्यातील क्षेत्रिय भेटी आणि विविध पाहणी अहवालाच्या सहाय्याने जिल्हा विकास अहवाल तयार केला आहे. यात प्रामुख्याने शिक्षण, शेती, स्वच्छता, माता-बालमृत्यू, जन्मदर आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आदींबाबत माहिती सादर केली. मुलींचे प्रमाण दोन दशकामध्ये कमालीचे कमी होत असून प्रामुख्याने केळापूर आणि घाटंजी तालुक्यात हे प्रमाण अधिक आढळले. बालमृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, जन्मदर हा जिल्ह्याचा समाधानकारक आहे. जिल्ह्यातील महिलांमध्ये ॲमिबिया आणि बालकांच्या कुपोषणाचा दर कमी आहे. जिल्ह्यातील काही भागात पाण्याचे साठे हे फ्लोराईडयुक्त आढळले आहे. पाण्याबाबत जिल्ह्यात चार यंत्रणा कार्यरत असून या माध्यमातून नागरीकांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना जिल्ह्यातील दर हजार नागरीकांमागे साडेतीन डॉक्टर आहेत. हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात डॉक्टरांएवढीच नर्सेसची संख्या आहे, मात्र खासगी रूग्णालयात प्रशिक्षीत नर्सेसची कमी असल्याचे दिसून आले आहे. स्वच्छता, पाणी आणि धोकादायक इंधनाचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
सादरीकरणातून समोर आलेल्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी, जिल्ह्याचे क्षेत्र हे व्यापक आहे. त्याप्रमाणात येथील समस्यांची आकडेवारी ही कमी आहे. जिल्ह्‌याची आर्थिक व्यवस्था ही शेतीशी निगडीत असल्यामुळे शेतीतून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षी साडेतीन लाख हेक्टरपर्यंत रब्बीचे पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात वन क्षेत्र मोठे असून या वनावर आधारीत उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रामुख्याने सागवानावर उद्योग उभारता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात कापूस उत्पादन अधिक होत असल्याने यावर आधारीत उद्योग आणि कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दाळीचे उत्पादन वाढीसाठी यावर्षी भर देण्यात आला. यापुढील टप्पा म्हणून जिल्ह्यातील 101 मंडळस्तरावर एक मिनी दाळ मिल देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कृषिसोबत शिक्षण आणि रोजगारामध्ये बदल घडवून बदलत्या परिस्थितीला अनुरूप जिल्ह्यातील व्यवस्था बदलविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
00000

शेतकऱ्यांचा माल थेट विक्रीसाठी कृषि महोत्सव
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*यवतमाळात मार्चमध्ये आयोजन
* 200 स्टॉलवरून विक्रीची सोय
यवतमाळ, दि. 31 : शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, तसेच त्यांना बदलत्या काळानुरूप शेतीतील तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी जिल्हा कृषि महोत्सव मार्च महिन्याच्या अखेर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. कृषि महोत्सवाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास मोठे महत्त्व आहे. तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांनी केलेले प्रयत्न आणि शेतीमध्ये येत असलेले नवीन तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शेतीतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती व्हावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाशी संपर्क साधावा, त्यांच्यासाठी स्टॉल आरक्षित करावे. जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ चांगली रूजली आहे. त्यांची उत्पादने विक्रीसाठी ठेवता येतील. त्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क साधून स्टॉल लावण्यासाठी प्रयत्न करावेत. या महोत्सवाच्या माध्यमातून शेती संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल ग्राहकांना थेटपणे विक्री करता यावा, यासाठी आत्मातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंडवर मार्च महिन्याच्या शेवटी आयोजन होणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादित माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यामध्ये दलालांची मोठी साखळी निर्माण झाली आहे. यात ग्राहक आणि उत्पादक या दोघांचेही नुकसान होते. या दोघांनाही लाभ व्हावा, यासाठी या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी गटांमार्फत उत्पादित गहू, ज्वारी, हरभरा, तूर दाळ, जवस, सेंद्रीय गुळ, तीळ, भाजीपाला, फळे आदी शेतमाल विक्रीसाठी 200 स्टॉल उभारले जाणार आहेत. या धान्य महोत्सवामध्ये शेतकरी आणि शेतकरी गटांना शेतमाल विक्रीस ठेवायचा आहे. या महोत्सवात शेतकरी आणि ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
00000 
अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक 2017
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
मतदारांना सुटी देण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 31 : भारत निवडणुक आयोगाने अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषित केलेली आहे. या कार्यक्रमानुसार दि. 3 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याबाबत भारत निवडणूक आयोग व सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामधील पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांना सदर निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी (विशेष नैमित्तीक रजा) देण्यात यावी. तर मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम/अखंडीत उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यामधील पदवीधर मतदार म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त, अमरावती तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी