जिल्ह्यातील 300 गावे पाणी समृध्द करण्याचे उद्दिष्ट - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



v  सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेबाबत कार्यशाळा 
यवतमाळ, दि. 21 : बदलत्या निर्सगाचे खुप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यावर्षी जिल्ह्यात जवळपास 24 टक्के पाऊस कमी झाला आहे. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे त्याचा शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होतो. निसर्गाच्या या बदलत्या आव्हानावर जलसंधारण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा – ४ मध्ये जिल्ह्यातील जवळपास 300 गावे पाणी समृध्द करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
बचत भवन येथे वॉटर कप स्पर्धेबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते.
गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविणा-या सर्व गावक-यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, आपल्या समोरील आव्हान अजून संपले नाही. यावर्षी जिल्ह्यात सरासरी 76 टक्के पाऊस झाला आहे. काही तालुक्यात तर ही आकडेवारी केवळ 40 टक्क्यांपर्यंत आहे. असे असले तरी जलसंधारणाच्या कामामुळे गत पाच वर्षातील जिल्ह्याची सरासरी पाणी पातळी 1.42 मीटरने वाढली आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये लोकसहभागाचा उत्साह दिसून येत आहे. झपाटल्याप्रमाणे गावक-यांचा यात सहभाग आहे. जलसाठ्यांमुळेच दुष्काळी गावातील उत्पादनात वाढ झाली आहे. मडकोनामध्ये शोषखड्ड्यांमुळे पाणी पातळी वाढली आहे. गत वर्षी वॉटर कपमध्ये ज्या गावांनी बक्षीसे मिळविली, त्यांचा आदर्श इतरही गावांनी घ्यावा.
यावर्षीसुध्दा कृषी, वन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने वॉटर कपसाठी चांगले नियोजन करण्यात येईल. विहिर पुनर्भरणामुळे मोठा फायदा झाला असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नरेगाच्या माध्यमातून शोषखड्डे विहीर पुनर्भरण मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन आहे. यावर्षी कृषी विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिका-यांनी याबाबत सुक्ष्म नियोजन करावे. तसेच वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होणारी जवळपास 300 गावे पाणी समृध्द करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ म्हणाले, गत तीन वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे. दिवसेंनदिवस याला चांगला प्रतिसाद मिळत असून याचे श्रेय समाजाला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणा-या गावांना पाणी फाऊंडेशनच्यावतीने एकही पैसा दिला जात नाही. जलसंधारणाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना केवळ ज्ञान आणि उर्जा दिली जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानामुळे समाज एकत्र येतो. जलसंधारणाची कामे करतांना माणूस उभा करणे ही पाणी फाऊंडेशनचे काम आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वॉटर कप स्पर्धा – ४ मधील गुणांकनाची पध्दत आदी बाबींबाबत माहिती दिली.
कार्यशाळेला कृषी विभाग, जलसंधारण विभाग तसेच महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियानचे ग्राम प्रवर्तक यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी