जमिनीचे आरोग्य तपासणे काळाची गरज - पालकमंत्री मदन येरावार




Ø कृषी विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिन
यवतमाळ, दि. 05 : भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. चांगल्या मातीच्या भरोश्यावरच शेतक-याचे जीवन अवलंबून आहे. मात्र सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात अति रासायनिक किटकनाशकांमुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य तपासणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा मृद सर्वेक्षण, मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जागतिक मृदा दिनानिमित्त ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृह येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी मंचावर सहायक संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, मृद चाचणी अधिकारी कैलास चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.
जमिनीची सुपिकता आणि पोत सुधरविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, हे यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाचे युग असले तरी जमिनीत गहू टाकले तर पीठ निघत नाही. तसेच धान टाकले तर भात उगवत नाही. शेतक-यांच्या घामाच्या सिंचनातून सुपीक मातीच्या सहाय्यानेच पीक काढावे लागते. शेतक-यांनीच राष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले असून आज विदेशात आपण अन्न-धान्याची निर्यात करीत आहोत. हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक, जलसंधारणाचे महत्व सांगणारे सुधाकरराव नाईक हे याच यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र होते, याचा आपल्याला अभिमान आहे. कृषी क्षेत्रात या दोन महात्म्यांचे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे भरीव योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
गत तीन वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली. संपूर्ण राज्यात चार वर्षात सुमारे पाच लक्ष शेतक-यांना विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. शासनाच्या अनेक योजना शेतक-यांसाठी आहे. शेती हा रोजगार मिळवून देणारा उद्योग करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतक-यांनी कृषी विज्ञान केंद्राचे येणारे मॅसेज काळजीपूर्वक वाचावे. मृदा परिक्षण, शेतीतील आपला अनुभव आणि कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन याचा विचार करून योग्य पीक घ्यावे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीची क्षारता, कार्बन, लोह, गंधक, तांबं, जस्त आदी बाबी पाहणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मातीशी प्रत्येकाचे घट्ट नाते : सहपालकमंत्री संजय राठोड
आपण उदरनिर्वाहासाठी कुठेही असलो तरी प्रत्येकाचे मातीशी घट्ट नाते असते. मातीविषयी आपल्याला नेहमीच अभिमान राहिला आहे, असे सहपालकमंत्री संजय राठोड म्हणाले. माती ही जमिनीची त्वचा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, त्याचप्रमाणे मातीची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक प्रदुषणामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. पुर्वीसारखा आता मातीचा दर्जा राहिला नाही. रसायनाच्या अधिक वापरामुळे मातीत कोरडेपणा आला आहे. आपण कसत असलेल्या जमिनीची आरोग्यपत्रिका प्रत्येकाजवळ असली पाहिजे, याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशा सुचना त्यांनी केल्या.
सुरवातीला मान्यवरांनी स्व.वसंतराव नाईक आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी श्रावण नागनवरे, शुभम भारती, कृष्णा वायकर यांच्यासह आदींना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी