ग्रंथामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर - पालकमंत्री मदन येरावार





Ø नगर भवन येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 17 : समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे. नागरिक ग्रंथोत्सवाची वाट बघत असतात. आयुष्याला दिशा देण्याचे काम ग्रंथांमुळे होत असून त्यामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर पडते, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर भवन येथे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, ग्रंथालय सहायक संचालक जगदीश पाटील, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शेंडगे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आर.आर. राऊत, सहकार्यवाहक विनोद देशपांडे आदी उपस्थित होते.
ग्रंथ हे गुरुस्थानी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, वाचनाने मानवी जीवनावर संस्कार घडत असतात. त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते. जीवनाचा सार ग्रंथामध्ये आहे. श्रीकृष्णाने अर्जुनासाठी लिहिलेली भगवतगीता आजच्याही युगात महत्वाची वाटते. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विलियम्स्‍ अंतराळात गेली तेव्हा तिच्या हातात भगवतगीता होती. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर विकत घेतले होते, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, वाचन ही एक कला आहे. मात्र तिचा नियमित सराव केला पाहिजे. वाचन हा बुध्दीचा आहार आहे. त्यामुळे पुस्तकाशी नाते जोडा. समाजात वाचन संस्कृती प्रभावीपणे वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जवळपास सहा कोटी रुपये खर्च करून येथे बांधण्यात येणारे अत्याधुनिक वाचनालय चार-पाच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुढील महिन्यात 92 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे होत आहे. सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारच्या धर्तीवर येथील प्रत्येक तालुका स्तरावर पुस्तकाचे गाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच साहित्य संमेलनात सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी बोलतांना नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर भवनात हा ग्रंथोत्सव आयोजित केला जातो. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे. वाचनानंतर पुस्तकातील गोष्टी आचारणात आणा. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने येथे साकारण्यात येणारे अत्याधुनिक वाचनालयाला पालिकेने त्वरीत जागा उपलब्ध करून दिली. या वाचनालयामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्या उपस्थितीत शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी केले. संचालन प्रा. राजेश चव्हाण यांनी तर आभार गजानन कासावार यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी