ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांसाठी जनजागृती प्रशिक्षण


Ø मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकाला सुरवात
Ø जिल्हा प्रशासनाची विशेष मोहीम
यवतमाळ, दि. 27 : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरवात जिल्ह्यात 26 डिसेंबरपासून करण्यात आली आहे.
 यवतमाळ जिल्ह्या वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद व उमरखेड असे सात विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 21 लक्ष 30 हजार 89 असून एकूण मतदान केंद्रांची संख्या 2491 आहे. जिल्ह्याला 2993 व्हीव्हीपॅट मशीन, 2993 कंट्रोल युनीट आणि 5048 बॅलेट युनीट प्राप्त झाले आहे. यापैकी प्रत्येकी 30 व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिकासाठी वापरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आगामी 45 दिवसात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत विश्वासार्हता निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत बॅलेट युनिटमधील मतदान व व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्याद्वारे येणारे मतदान सर्व नागरिकांसमोर मोजून दाखविण्यात येत आहे. तसेच दोन्ही मतदानाची संख्या समान असल्याची खात्री करून दिल्या जात आहे. मतदाराने केलेले मतदान हे त्याच उमेदवाराला व त्याच चिन्हाला दिल्या जात आहे किंवा नाही याबाबत मतदाराचे पूर्णपणे समाधान प्रात्यक्षिकाद्वारे करून दिले जात आहे.
जिल्ह्यामध्ये 26 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 50 मतदान केंद्रावर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या ठिकाणी 2909 मतदार उपस्थित होते. त्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात दोन वाहन व दोन ईव्हीएम मशीनद्वारे पुढील 45 दिवस जनजागृती करण्यात येणार आहे.
मतदाराला अशी दिसेल स्लीप : व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रिंटर असून मतदाराने कोणाला मत दिले हे त्याला कळणार आहे. यासाठी थर्मल पेपरवरील 56 बाय 99 मिमी लांबीची स्लीप बाहेर येईल. ती सात सेकंद मतदाराला बघता येणार आहे. त्यानंतर ती कट होऊन बॅलेट स्लीप बॉक्स मध्ये जमा होईल. व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट जोडून आहे की नाही हे मशीनचे कंट्रोल युनिट चेक करेल. बॅलेट युनिटमध्ये ब्रेल लिपीचाही समावेश करण्यात आला आहे. मशीन वाहून नेण्याकरीता कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्यासाठी वेगवेगळ्या बॅग आहेत. आगामी काळात एम-3 या ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मशीन सुरू केल्यानंतर तारीख आणि वेळ योग्य दाखविली तर मशीन योग्य आहे.
निवडणूक प्रक्रियेचा एक मास्टर ट्रेनर म्हणून अधिकारी व कर्मचा-यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत तंतोतंत, तांत्रिक आणि अभ्यासपूर्ण माहिती नागरिकांना द्यावी. या मशीनबद्दल नागरिकांच्या मनात कोणतीही शंका उद्भवणार नाही, याची काळजी घेऊन नागरिकांच्या शंका दूर कराव्यात. तसेच नागरिकांनीसुध्दा ही संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यावी व आगामी निवडणुकांत मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी