ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती अभियान प्रशिक्षण






v  26 डिसेंबरपासून संपूर्ण तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिक 
यवतमाळ, दि. 18 : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवन येथे ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचा-यांमार्फत 26 डिसेंबरपासून जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिक करून नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यात येतील
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मार्गदर्शक वैभव येंडे आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत अधिकारी आणि कर्मचा-यांनी येथे घेतलेले प्रशिक्षण प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत जावून द्यायचे आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांचे लक्ष राहणार आहे. त्यांच्या सुचनेनुसारच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेचा एक मास्टर ट्रेनर म्हणून अधिकारी व कर्मचा-यांनी याबाबत तंतोतंत, तांत्रिक आणि अभ्यासपूर्ण माहिती अवगत करून घ्यावी. तसेच प्रशिक्षित झाल्यानंतर आपापल्या क्षेत्रातील संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांकडून त्याची उजळणी करून घ्यायची आहे. ग्रामस्तरावरील हेच कर्मचारी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत.
या मशीनबद्दल नागरिकांच्या मनात कोणतीही शंका उद्भवणार नाही, याची काळजी घेऊन नागरिकांच्या शंका दूर करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळण्यासाठी कोणतीही चूक होऊ देऊ नका. हा विषय संपूर्णपणे आत्मसाद करून यासाठी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
यावेळी अधिकारी व कर्मचा-यांना ईव्हीएम मशीनबाबत मार्गदर्शन करतांना शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा.वैभव येंडे म्हणाले, मशीनमध्ये क्लॉक ऐरर दाखविला तर मशीन बदलायची आहे. व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट जोडून आहे की नाही हे मशीनचे कंट्रोल युनिट चेक करेल. बॅलेट युनिटमध्ये ब्रेल लिपीचाही समावेश करण्यात आला आहे. मशीन वाहून नेण्याकरीता कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्यासाठी वेगवेगळ्या बॅग आहेत. आगामी काळात एम-3 या ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. मशीन सुरू केल्यानंतर तारीख आणि वेळ योग्य दाखविली तर मशीन योग्य आहे. एम-3 या मशीनमध्ये जास्तीत जास्त 2 हजार मते नोंदविता येतील. तर व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रिंटर असून मतदाराने कोणाला मत दिले हे त्याला कळणार आहे. यासाठी थर्मल पेपरवरील 56 बाय 99 मिमी लांबीची स्लीप बाहेर येईल. ती सात सेकंद मतदाराला बघता येणार आहे. त्यानंतर ती कट होऊन बॅलेट स्लीप बॉक्स मध्ये जमा होईल. एका मशीनमधून जवळपास 1200 ते 1400 स्लीप निघणार असल्याचे येंडे यांनी सांगितले. यावेळी अधिकारी व कर्मचा-यांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी