पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक


यवतमाळ, दि. 29 :  सन 2018-19 च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मंजूरी व प्रारुप वार्षिक योजना सन 2019-20 च्या विकास क्षेत्रातील योजनांसाठी प्रस्तावित नियतव्यय संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.
नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री वजाहत मिर्झा, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री आदी उपस्थित होते.
पांदण रस्ते हा प्रत्येक गावासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात पालकमंत्री पांदण रस्ते योजना सर्व लोकप्रतिनिधींनी राबविली तर जिल्ह्यात मोठे काम होऊ शकते. तसेच यवतमाळ हे राज्यासाठी एक मॉडेल ठरेल. मात्र यासाठी वेगवेगळ्या विभागाचा निधी एकत्र करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 900 पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहे. ज्या गावात स्मशान भुमीत शेडच नाही अशा 16 तालुक्यातील गावांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यात ‘108’ रुग्णवाहनांची संख्या 23 आहे. खनीज विकास निधीतून आरोग्य विभागासाठी आणखी 11 नवीन वाहने देण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘108’ रुग्णवाहनांच्या उपलब्धतेसाठी जागेची पुनर्रचना करण्यात येईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या व यादी सर्व नगर पालिकांनी लावावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी 11 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, इतिवृत्तावरील अनुपालन अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) सन 2019-20 च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे, सन 2018-19 अंतर्गत 15 डिसेंबरपर्यंत अर्थसंकल्पीत निधीचा झालेला खर्चाचा आढावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
                                                                ०००००००                                                              





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी