दिव्यांगाच्या विकासासाठी शासन कटिबध्द – पालकमंत्री मदन येरावार



यवतमाळ, दि. 26 : दिव्यांग व्यक्तिंमध्ये अनेक सुप्त गुण असतात. समाजाने त्यांच्याबद्दल केवळ सहानुभूतीपूर्वक विचार न करता त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून त्यांचा चालना द्यावी. शासनाने दिव्यांग नागरिकांकरीता सुधारीत विकास धोरण आणले असून दिव्यांगाच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
संदीप मंगलम येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, पालिकेचे बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, नियोजन सभापती भानुदास राजने, शिक्षण सभापती निता केळापुरे, महिला व बालकल्याण सभापती नंदा जिरापूरे आदी  उपस्थित होते.
सुधारीत दिव्यांग विकास धोरणानुसार पुर्वीच्या 3 टक्के निधीत वाढ करून शासनाने दिव्यांग विकास निधी 5 टक्के केला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, दिव्यांगाना दिला जाणारा उदरनिर्वाह भत्ता दुपटीने वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दिव्यांगाना घरकुल देण्याची योजना यापूर्वीच जाहीर झाली आहे. दिव्यांग व्यक्तिंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यानी केले.
खासदार भावना गवळी म्हणाल्या, दिव्यांगांच्या व्यथा आणि प्रश्न भरपूर आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचे असून राज्य शासन याबाबत प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, यवतमाळ नगर परिषदेने आपल्या राखीव निधीतून प्रतिमाह 500 रुपये सानुग्रह निर्वाह भत्ता याप्रमाणे 295 दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 8 लक्ष 85 हजार रक्कम जमा केली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांना लवकरच हा निधी देण्यात येईल.  शिवाय कल्पक योजनेंतर्गत गरजुंना साहित्य वाटप करण्याकरीता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवीण शेंडे व प्रिया शेंडे या दांम्पत्याचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत दीपक खेरडे यांना बँकेकडून मंजूर झालेल्या कर्जाचे पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी केले. संचालन डॉ. विजय अग्रवाल यांनी तर आभार सुनील वासनिक यांनी मानले. कार्यक्रमाला स्थायी समिती सदस्य जगदिश वाधवानी, वैशाली सवाई, नगरसेवक गजानन इंगाले, पंकज मुंदे, विजय खडसे, गणेश धवने, चंद्रशेखर चौधरी यांच्यासह नगर सेवक, नगरसेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी