ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा - सीईओ जलज शर्मा

                                                     
Ø ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा



यवतमाळ, दि. 07 : कर्तव्य बजावत असतांना सिमेवर वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलित केला जातो. याची सुरवात 7 डिसेंबर या दिवसापासून होत असते. शहिदांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणा-या या योजनांकरीता ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने बचत भवन येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, पोलिस उपअधिक्षक (गृह) अनिलसिंग गौतम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ उपस्थित होते.
ध्वजदिन निधी 2018 संकलनाचा शुभारंभ झाला, असे जाहीर करून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, ध्वजदिन निधी संकलनात यवतमाळ जिल्हा हा अग्रेसर राहिला आहे. यावर्षीसुध्दा सर्वांच्या सहकार्याने वेळेपूर्वी ध्वजदिन निधी संकलित करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि नागरिकांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात 1185 माजी सैनिक, 632 माजी सैनिक विधवा, 8 वीरपत्नी आणि एक वीरपिता आहे. तसेच दुस-या महायुध्दात जिल्ह्यातील जवळपास 76 जवानांनी सहभाग नोंदविला होता, असे त्यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले, महसूल प्रशासनासाठी 7/12 हा अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज आहे आणि ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभसुध्दा 7 डिसेंबर रोजीच होतो. या निमित्ताने सैनिक आणि महसूल विभागाचा अनोखा संबंध जूळून आला आहे. या देशासाठी सैनिकांचे योगदान न मोजता येणारे आहे, त्याची कधीच परतफेड होऊ शकत नाही. जिल्हा सोडून इतरत्र बदली झाली की शासकीय कर्मचारी दुस-या ठिकाणी जायला तयार होत नाही. आपल्या देशाचे सैनिक मात्र अहोरात्र सीमेवर आपले कर्तव्य बजावत आहे. जिल्हा प्रशासन हे सैनिकांसोबत आहे. काही माजी सैनिक शासकीय सेवेत रुजू झाले असून बदलीमध्ये त्यांच्या पसंतीचा पहिला क्रम प्रशासनाने त्यांना दिला आहे, असे निवासी उपजिल्हाधिका-यांनी सांगितले. यावर्षीसुध्दा उद्दिष्टापेक्षा जास्त निधी वेळेआधी संकलित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी सर्वश्री अलकनंदा सरोदे, स्नेहा कुळमेथे, राधाबाई बोरीकर, वीरपिता यशवंत थोरात आदींचा शाल व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी तर संचालन बालाजी शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाला वीर नारी, वीर पिता, वीर माता यांच्यासह माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, अँग्लो हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, सैनिकी वसतीगृहाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी