नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी जिल्ह्याला 373 कोटी - पालकमंत्री मदन येरावार





Ø 309 गावांचा होणार कायापालट
Ø लाभार्थी शेतक-यांना ट्रॅक्टरचे वाटप
यवतमाळ, दि. 28 :  ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी स्व. नानाजी देशमुख यांनी शेतीपयोगी मॉडेल तयार केले होते. याच मॉडेलचा आधार घेऊन राज्य शासन आणि जागतिक बँकेने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्याला 373 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून जिल्ह्यातील 309 गावांचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अनेक शेतीपयोगी योजनांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्य शासन व जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने 2017 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. हवामानाशी संबंधित धोरण, अनुकूल बि-बियाणे, कृषी विस्तार सल्ला, पायाभूत सुविधा आदींचा यात समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतक-यांना सक्षम करणे, शेती व्यवसाय किफायतशीर करणे, शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. कृषी क्षेत्राला भरारी देण्यासाठी राज्य शासनाने पहिल्या वर्षी 13 000 कोटी, दुस-या वर्षी 16000 तर तिस-या वर्षी 19000 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी ही योजना आणली असून प्रधान नावाची सामाजिक संघटना यात काम करीत आहे. घरकुल ते शेततळे, धडक विहिर ते कृषीपंप, शेळीवाटप, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, शेटनेट आदींचा यात समावेश आहे. शेतक-यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. या योजनेत येणा-या लाभार्थ्यांची निवड ग्रामस्तरावरील समितीने त्वरीत करावी. यवतमाळ जिल्हा आज शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजनेत आघाडीवर आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा प्रशासन अभिनंदनास पात्र आहे, असे त्यांनी सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने कृषी क्षेत्राला ख-या अर्थाने संजीवनी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, दिवसेंदिवस हवामान बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात तीन टप्प्यात जिल्ह्यातील 309 गावांची निवड झाली आहे. वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचे विकेंद्रीकरण ग्रामस्तरापर्यंत करण्यात आले असून ग्रामकृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात सरपंच हे समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक हे सदस्य सचिव आहेत. गावस्तरावील लाभार्थी निवडण्याचे अधिकार या समितीला आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 9001 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून पुढील दहा दिवसांत या अर्जांना मंजुरी द्यावी. तसेच अर्जाची पुर्वपडताळणी उपविभागीय स्तरावर करावी, अश सुचना त्यांनी केल्या. 309 गावातील शेतक-यांसाठी अतिशय चांगली संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उन्नत शेती समृध्द शेती योजनेंतर्गत कृष्णकुमार वानखडे, प्रमोद कातारकर, सुरेश डबले, सिंधू चिकटे, आशा सोळंके, कल्पना हनवते, अनिता वानोडे यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गजानन घाटे यांनी केले. यावेळी अरविंद भेंडे, रामदास पटमासे यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी