जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांचे समाधान करा - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 12 :  ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना ह्या जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून पोहचत असतात. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द आहे. जनसुविधा केंद्र हे नागरिकांसाठी आहे. त्यामुळे या केंद्रात काम करणा-यांनी नागरिकांना तत्पर सेवा देऊन त्यांचे समाधान करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणा-या सेवांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र भुयार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे उपस्थित होते.
जनसुविधा केंद्राला शासनाने संगणक, प्रिंटर, वेब कॅमेरा आदी बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, काही ठिकाणी जागेचा प्रश्न राहू शकतो, तो लवकरच निकाली काढण्यात येईल. ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नसेल तर जिल्हा परिषदेने या केंद्रासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून नागरिकांना सुविधा मिळण्यास मदत होईल. सुविधा केंद्रात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असेल तर त्यावर तोडगा काढण्यात येईल. कर्जमाफीचे अर्ज, पीक विम्याचे अर्ज, विविध प्रमाणपत्र वाटप या केंद्राच्या माध्यमातून होत असते. नागरिकांना चांगली सेवा मिळाली नाही की शासनावर दोषारोप होतो. याबाबत संबंधित जिल्हा व्यवस्थापकाने गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच जनसुविधा केंद्राच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे माहिती द्यावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कर्जमाफी योजनेचा डाटा तयार होणार आहे. जनसुविधा केंद्रांवर कामाबाबत आणखी जबाबदारी देण्यात येईल. केंद्रांच्या ब्लॉक समन्वयकाने आपल्या हद्दितील सुविधा केंद्राची पाहणी करावी. समस्यांबाबत जिल्हा व्यवस्थापकाला अवगत करून त्या कशा सोडविता येईल, यादृष्टीने काम करावे. तसेच जिल्हा परिषदेनेसुध्दा या सर्वांवर नियंत्रण ठेवून जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या सेवा पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असावे. लोकांना चांगली सेवा देणे आपली जबाबदारी आहे. सेवा हमी कायद्याने सर्वांवर जबाबदारी निश्चित केली आहे. आपणही आपल्या कामात प्रामाणिक राहून जनतेचे समाधान करावे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.  
यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, गावातील व्यक्तिचे काम गावातच व्हायला पाहिजे. त्यासाठीच जवळपास जनसुविधा केंद्र उपलब्ध करून दिले आहे. सुविधा केंद्राच्या समन्वयकाने चांगल्या पध्दतीने काम करून त्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवाव्यात. तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जावून अडीअडचणी  समजून घ्याव्यात. सुविधा केंद्राच्या ज्या काही समस्या असतील त्या प्रशासन स्तरावर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी ,जनसुविधा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक, समन्वयक, केंद्र चालक आदी उपस्थित होते.     
                                                                   000000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी