जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द - पालकमंत्री मदन येरावार

Ø प्रमाणपत्र वाटप व डिजीटलायझेशन मध्ये जिल्हा अव्वल
Ø कृषी महाविद्यालय, सिंथेटिक ट्रॅक, वातानुकूलीत अभ्यासिका उपलब्ध होणार
Ø संगणकीकृत सातबारा आपले सरकार पोर्टलद्वारे उपलब्ध
यवतमाळ, दि. 16 :  भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कार्य करीत आहे. हे सरकार माझं आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.

पुढे पालकमंत्री येरावार म्हणाले, शासनाने सेवा हमी कायदा आणला आहे. या कायद्यांतर्गत संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत करून ऑनलाईन प्रणालीमार्फत दाखले वितरणाचे काम सुरु आहे. यात जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. आतापर्यंत महा-ई-सेवा केंद्र व सेतुमार्फत संगणीकृत 7/12 उपलब्ध होत होते. आजपासून जिल्ह्यातील 200 गावांत संगणकीकृत 7/12 आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन पेमेंट करून प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात माहितीच्या अधिकाराचे अर्ज ऑनलाईन करण्यात आले असून ई-महाभुमी, ई-मोजणी, ई-चावडी, ई-फेरफार, ई-नकाशा, ई-अभिलेख हे उपक्रमसुध्दा राबविण्यात येत आहे.

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास 3 लक्ष 14 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 395 गावांमध्ये 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त धरण अंतर्गत लोकसहभागातून 65 तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. तीन वर्षात 3 हजार 260 धडक सिंचन विहिरी तर नरेगा अंतर्गत 5 हजार 183 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 1092 ग्रामपंचायतीमध्ये 2 लक्ष 8 हजार 338 मजुरांना रोजगार मिळाला आहे. यासाठी त्यांना 72 कोटी 20 लक्ष रुपये मजुरी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 17 हजार 872 कृषी पंप विद्युत जोडणी करण्यात आली आहे. 329 लाभार्थ्यांच्या शेतात सौर कृषी पंप लावण्यात आले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 5 कोटी 35 लक्ष रुपयांचे शेततळे देण्यात आले आहे. जिल्ह्यात 5 लक्ष 6 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तूर खरेदीचे 234 कोटी 15 लक्ष रुपये शेतक-यांना अदा करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी योजनेअंतर्गत मांजर्डा येथे दोन मेगावॅटचा सौर प्रकल्प उभा राहत आहे. तसेच यवतमाळ येथे कृषी महाविद्यालयाकरीता 67 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतक-यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 92 शेतक-यांची सावकारी कर्जातून मुक्तता करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी घडावेत या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित अभ्यासिकेसाठी 5 कोटी 33 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बेघर स्वातंत्र्य सैनिकांच्या घरकुलासाठी 10 लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटरच्या सिंथेटीक ट्रॅकसाठी 6 कोटी 82 लक्ष 67 हजार रुपये मंजूर झाले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत शेतक-यांना थेट खरेदीने चारपटीपेक्षा जास्त मोबदला त्यांच्या गावी जाऊन दिला जात आहे. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागात एक हजार कोटीचे महामार्ग मंजूर झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देणारा समृध्दी महामार्ग शासनाने हाती घेतला आहे. औद्योगिक क्षेत्रात 93.52 हेक्टर जागेवर टेक्सटाईल पार्क प्रस्तावित असून पार्कमध्ये सेवासुविधा पुरविण्याच्या कामासाठी 7 कोटी 89 लक्ष रकमेची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

सिंचन क्षमतेनुसार पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने 133 कोटींचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ३०२ कोटी रुपयांची अमृत  योजना हाती घेण्यात आली आहे. तसेच सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 185 कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली आहे. वर्दळीच्या ठिकाणी अंडरग्राऊंड वीज वाहिणी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी उद्दिष्टापेक्षा जास्त 33 लक्ष 51 हजार वृक्षलागवड केली आहे. तसेच जांब रोडवर 36 हेक्टर परिसरात 9 कोटी रुपये खर्च करून वनउद्यान उभे राहात आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत शिशु, किशोर व तरुण गटात कर्जाचे वाटप सुरु आहे. जिल्ह्यात तिनही गटातील एकूण 14 हजार 201 खातेदारांना 103 कोटी 7 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 
 
जीवनदायी आणि अन्न सुरक्षा योजना या दोन्हीसाठी उत्पन्नाची अट शिथील करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ प्राधान्य गटात 14 लक्ष, अंत्योदय शिधापत्रिकाधारक 1 लक्ष 30 हजार तर शेतकरी कुटुंबातील 93 हजार व्यक्तिंना देण्यात येत आहे. यवतमाळ येथे 100 खाटांचे महिला व बालकल्याण रुग्णालय तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसहाय्याने एकूण 225 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल बांधण्यात येत आहे. अवयवदान हे एक महान कार्य आहे. नागरीकांनी अवयवदान करून रूग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार लावावा. तसेच राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलित केल्यामुळे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. या निमित्ताने पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. याशिवाय पोलिस उपनिरीक्षक सुरज बोंडे, यवतमाळच्या प्रथम महिला ठाणेदार शीतल मालटे, शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेला अरमान शेंडे, पोलिस पाटील अशोक भोयर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.     
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी