“संकल्प ते सिध्दी” मुळे देशाची विकासाकडे वाटचाल -पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 26 :  शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील शेतक-याला स्वाभिमानाने उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने नवनवीन तंत्रज्ञानासोबत अनेक योजना आणल्या आहेत. गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, कुपोषण, सांप्रदायिकता आदींपासून देशाला मुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला आहे. त्यासाठी लोकांचेसुध्दा सहकार्य अपेक्षित आहे. संकल्प ते सिध्दी हे अभियान याचाच एक भाग आहे. या अभियानामुळे देशाची वाटचाल विकासाच्या नवीन पर्वाकडे होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
डॉ. नंदूरकर विद्यालयातील सत्यसाई क्रीडा रंजन येथे कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यामाने आयोजित संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोतकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पं.दे.कृ.विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र गोरडे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भाग समृध्द होणे गरजेचे आहे. त्यासाठी 2022 पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना कराव्या, हे सांगण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी प्रथमच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी थेट व्हीसीद्वारे संवाद साधला. शासनाने सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिका-यांनी गावक-यांना द्यावी. शेतक-यांना मुबलक वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामानावर आधारीत दिशादर्शक यंत्रे प्रत्येक सर्कलमध्ये लावण्यात येणार असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. सिंचन योजनेसाठी केंद्र सरकारने 26 हजार कोटी रुपये दिले. बेंबळा प्रकल्पांतर्गत 1 लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शाश्वत सिंचनाबरोबरच सुक्ष्म सिंचनावर शासनाचा भर आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
कौशल्य विकासाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत आहे. शासनाने 34 हजार 200 कोटींची कर्जमाफी जाहीर केली. जिल्ह्यातील जवळपास सव्वातीन लक्ष शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जनसुविधा केंद्र, महासेतू, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतक-यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या परिसरातील एकही लाभार्थी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी आवर्जुन लक्ष द्यावे. सोबतच उज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजना, माझी कन्या भाग्यश्री, संजय गांधी, श्रावणबाळ, कौशल्यविकास आदी योजनांचासुध्दा लाभ प्रत्येक गरजूला मिळाला पाहिजे. यवतमाळमध्ये टेक्सटाईल पार्क होत आहे. जिल्ह्यात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग यासोबतच पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. देशाची लोकसंख्या आज 125 कोटी असून यातील 70 टक्के लोकसंख्या ही 25 ते 35 या वयोगटातील आहे. या कार्यक्षमतेच्या बळावरच आपली वाटचाल महासत्तेकडे होऊ शकते, असे पालकमंत्री येरावार म्हणाले.
यावेळी संकल्प से सिध्दी यावर आधरीत पंतप्रधानांचा दृकश्राव्य संदेश चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. तत्पुर्वी उपस्थितांना नये भारत का संकल्प या विषयावर शपथ देऊन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तर उन्नत शेती, समृध्द शेती अभियानांतर्गत प्रतिभा भिसे यांना ट्रॅक्टरची चाबी सुपूर्द करण्यात आली. तसेच बिरसा मुंडा शेतकरी गटाला प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कोळपकर यांनी कृषी विभागाच्या, डॉ. काळे यांनी शेतकरी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक ठमके यांनी उपस्थितांना आपापल्या विभागाच्या योजना सांगिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे यांनी केले. संचालन विद्या चिंचोरे यांनी तर आभार आत्माचे डॉ. काळे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचायत व्यवस्थेतील सर्व अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                 0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी