अवयव दानातून गरजू लोकांना जीवनदान द्या -पालकमंत्री मदन येरावार


यवतमाळ, दि. 23 :   मरावे परी, अवयवदान रूपी उरावे ही संकल्पना नागरिकांनी मनात राबविणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. मृत्युनंतर आपल्या शरीरातील अवयव इतरांच्या उपयोगी पडू शकते. परिणामी कोणाचेतरी प्राण वाचविण्यात आपला हातभार लागू शकतो. त्यामुळे गरजू लोकांना जीवनदान देण्यासाठी नागरिकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान जनजागृती करण्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अशोक उईके, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, नगराध्यक्षा कांचन चौधरी, प्राचार्य डॉ. अशोक उईके, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, अभ्यागत मंडळाचे सदस्य जयंत झाडे, प्रवीण प्रजापती, माया शेरे, अमोल ढोणे उपस्थित होते.
पालकमंत्री येरावार पुढे म्हणाले, रक्तदान आणि नेत्रदान याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्याचे परिणाम आपल्याला निदर्शनास येत आहे. आज लोक स्वयंस्फुर्तीने रक्तदान आणि नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेत असतात. अशीच जनजागृती अवयव दानाबाबत होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या जनजागृती अभियानात सहभागी करून घ्यायला पाहिजे. अवयवदान जनजागृती ही केवळ दोन दिवसांची न राहता याबाबत नियमितपणे लोकांना अवगत करणे आवश्यक आहे. समाजसेवी संस्था, महाविद्यालयीन युवक-युवती, विविध सामाजिक संघटना आदींच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबवावी.
अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढा याचा फायदा लोकांना होणार आहे. स्पेन, अमेरिका, हाँगकाँग अवयव दानात बरेच पुढे आहे. आपला देशसुध्दा या देशांच्या पंक्तीत आला पाहिजे. माणसाच्या मृत्युनंतर सात अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात. त्यामुळे लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा. अवयवदानासंदर्भात लोकांना इत्यंभुत माहिती मिळाली की त्यांच्या मनात शंका-कुशंका राहणार नाही. त्यासाठी विविध ठिकाणी पोहचून सदस्यांच्या माध्यमातून पीपीटीद्वारे सादरीकरण करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने विविध विभागांना यात सहभागी करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वय साधावा. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातसुध्दा अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना आदींची बैठक घ्यावी, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी प्रास्ताविकातून अवयवदान जनजागृती अभियानादरम्यान राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ. धोटे, महाविद्यालयातील डॉक्टर्स, प्राध्यापक यांच्यासह लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                 0000000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी