जिल्हाधिका-यांनी पाठविले विभाग प्रमुखांना “फिल्डवर”

पीक विमाबाबत सनियंत्रण करण्याच्या सूचना

यवतमाळ, दि. 5 : पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यासंदर्भात शासननिर्णय प्राप्त होताच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. पीक विमा योजनेबाबत जिल्ह्यातील विविध केंद्रावर सनियंत्रण करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिका-यांनी फिल्डवर पाठविले.
पीक विमा योजनेचे ऑफलाईन अर्ज आज (दि.5) सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सेतू केंद्र, महा-ऑनलाईन केंद्र, महा ई- सेवा केंद्र, सीएससी, आपले सरकार तसेच आदी जनसुविधा केंद्रात ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील केंद्रांवर काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणे, काही अडचण असल्यास संबंधितांना सूचना देणे, केंद्रावर सनियंत्रण ठेवणे आदींकरीता जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना तातडीने पाठविण्यात आले आहे. प्रत्येक टीमकडे पाच-सहा गावातील केंद्रांना भेट देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आज सर्व केंद्रांवर केवळ अर्ज स्वीकारून त्यांना पोचपावती द्यावयाची आहे. शेतक-यांकडून पीक विम्याची रक्कम स्वीकारायची नाही. या केंद्रावर कशी प्रक्रिया सुरु आहे, याचे निरीक्षण विभाग प्रमुखांनी करायचे आहे. केंद्रावर काही अडचण आल्यास त्वरीत एसएमएस किंवा फोनवर संपर्क करून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. या कामात हयगय करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
बैठकीला सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सुचना केंद्राचे राजेश देवते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                             000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी