अवयदानात महाराष्ट्र क्रमांक दोनवर – पालकमंत्री येरावार

Ø जनजागृती अभियान समारोपात साधला संवाद

Ø अवयवदानासाठी पालकमंत्र्यांनी भरला नोंदणी अर्ज

यवतमाळ, दि. 29 : विदेशात अवयवदानाबद्दल लोकांमध्ये असलेली जनजागृती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळून बघितली. भारतातील नागरिकांनाही अवयवदानाचे महत्व पटावे, यासाठी केंद्र शासनाने अवयवदान जनजागृती अभियान सुरु केले. आपल्या राज्याने यात चांगले योगदान दिले असून आज अवयवदानात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, अभ्यागत मंडळाचे डॉ. फरात खान, प्रवीण प्रजापती, रेखा कोठेकर, माया शेरे, नितीन गिरी, जयंत झाडे उपस्थित होते.
शासनाच्या अवयवदान कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले आहे. याबद्दल सर्वांचे कौतुक करून पालकमंत्री येरावार म्हणाले, स्पेनमध्ये एक लक्ष लोकांमागे 100 नागरिक अवयवदान करतात. हाँगकाँग, युरोप आदी देश यात आघाडीवर आहे. ही चळवळ आपल्याही देशात रुजली पाहिजे. या अभियानासंदर्भात लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली आणि लोकांनी यात सहभाग नोंदविला तर आपला देश आणि राज्य नक्कीच प्रथम क्रमांकावर जाऊ शकतो. ज्याच्या शरीराची चिरफाड करून आपण वैद्यकीय शिक्षण घेत आहोत, अशा रुग्णांचे डॉक्टरांनी नेहमी स्मरण ठेवावे. देशात असंख्य लोकांना अवयवाची प्रतिक्षा आहे. किडनी, हृदय, कॉर्निया, त्वचा, नेत्र आदींची यादी मोठी आहे. मृत्युनंतर आपल्या देहावर विधीवत संस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. मरावे परी, अवयवदान रुपी उरावे   या संकल्पनेनुसार सामाजिक बांधिलकीतून आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो.
दिवसेंदिवस विज्ञानामुळे आपण यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत आहो. आजच्या युगात सामाजिक दायित्व दाखवून अवयवदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देश, समाज हा आपला परिवार आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली तर अवयवदान अभियान यशस्वी होईल. एकत्रित कुटुंबाची आपली संस्कृती होती. काळानुरुप आज कुटुंब छोटे झाले आहे. पाश्चिमात्य संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यात देशाची प्रगती होत आहे. स्वराज्य मिळविण्यासाठी देशात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी आपणही समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव ठेवावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी स्वत: अवयवदानासाठी नोंदणी अर्ज भरला. अवयवदान जनजागृती  अभियानादरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने आयोहित रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आदी स्पर्धेत क्रमांक पटकाविणा-या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कलापथकाद्वारे अवयवदानाबाबत कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी तर संचालन महाविद्यालयाचे जानकर यांनी केले. कार्यक्रमाला लायनेस क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक जागृती मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.
अवयवदान अभियान जनजागृती रॅली :
येथील पोस्टल ग्राऊंडवरून सकाळी अवयवदान जनजागृती अभियानासंदर्भात रॅली काढण्यात आली. राळेगावचे आमदार तथा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते सदर रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.जी. चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे आदी उपस्थित होते.
या रॅलीत महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालय, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, मातोश्री ऑर्गनायझेशन ऑफ एज्युकेशन, वाघवानी फार्मसी कॉलेज, वाधवानी कला व वाणिज्य महाविद्यालय, महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जाजू अभियांत्रिकी महाविद्यालय, बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, अमोलचंद कला व वाणिज्य महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, सुमित्राबाई ठाकरे नर्सिंग कॉलेज आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
                                                  0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी