खेळ हे जीवनाचे महत्वाचे अंग - पालकमंत्री येरावार

यवतमाळ, दि. 29 : देशाची ओळख ही स्वास्थावर ठरत असते. देश सुदृढ ठेवायचा असेल तर युवापिढीचे स्वास्थ चांगले असणे आवश्यक आहे. स्वास्थाचा संबंध हा खेळाशी येत असतो. खेळामुळे मन निरोगी राहते. निरोगी मन राज्याला आणि देशाला प्रगतीपथवार नेऊ शकते. त्यामुळे खेळ हे जीवनाचे महत्वाचे अंग आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दाते बीपीएड कॉलेज येथे क्रीडा भारती, हॉकी असोसिएशन, वुमेन्स स्पोर्ट क्लब, बाबाजी दाते क्रीडा अकॅडमी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप वडनेरकर होते. मंचावर अरविंद तायडे, हॉकी खेळाडू बबलू यादव, क्रीडा भारतीचे अध्यक्ष सतीश पाठक, महाविद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर, अनिल नायडू, राजेश गडीकर आदी उपस्थित होते.
संगणक, व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या युगात मैदानी खेळ कमी होत आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, स्पर्धेत आपला पाल्य टिकावा यासाठी पालकांकडून नेहमी अभ्यासाचा तगादा सुरु असतो. आमच्या काळात खेळासाठी क्रीडांगणावर जाणे अनिवार्य होते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यासासोबतच सुदृढ शरीर आवश्यक आहे. यातूनच आपले भविष्य घडू शकते. क्रीडा क्षेत्रात यवतमाळचे योगदान चांगले आहे. या क्षेत्रात माजी खेळाडू यांचे मार्गदर्शन नेहमी युवा खेळाडूंना झाले पाहिजे. भारताची मुख्य ओळख असलेला योग आता संयुक्त राष्ट्र संघटनेत पोहचला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात योग दिनाचे आयोजन करण्यात येते. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्हा नियोजन समितीतून क्रीडांगण विकास आणि क्रीडा साहित्यासाठी निधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी क्रीडांगणावर दिसले पाहिजे, असा आपला मानस आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरात हॉकीचे मैदान व्हावे, यासाठी पालकमंत्र्यांना खेळाडू आणि क्रीडा संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला हॉकी संघाच्या काजल तायडे, मनिषा झाडे, सपना आवटे, महिला वरिष्ठ गट हॉकी संघाच्या वैभवी खोडके, राष्ट्रीय खेळाडू सायली बझाडे, मयंक यादव माधुरी डंभाळे, सुजित पत्रे यांच्यासह हॉकी असोसिएशनच्या सचिव मनिषा आकरे, माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू ऋती कोलवाडकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अनंता पांडे यांनी तर आभार प्रफुल्ल गावंडे यांनी मानले. कार्यक्रमाला अविनाश जोशी, अजय म्हैसाळकर यांच्यासह खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.
                                                            00000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी