केवळ शिक्षित नाही तर सुशिक्षित पिढी निर्माण करा - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 14 :  भारत हा युवकांचा देश आहे. देशातील 70 टक्के लोकसंख्या 25 ते 35 या वयोगटातील आहे. याचाच अर्थ कार्यक्षम युवक हा आपला मुख्य आधारस्तंभ आहे. आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी आई-वडील अथक परिश्रम घेत असतात. त्याची जाणीव मुलांनीही ठेवणे गरजेचे आहे. उज्वल भविष्यासाठी शाळा- महाविद्यालयांनी केवळ शिक्षित नाही तर  सुशिक्षित पिढी निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
मोहा येथील महर्षी विद्या मंदिरात चिंतामणीबाई श्रीरामजी व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर शाळेचे प्राचार्य एस.एन.तिवारी, निवृत्त मेजर जाधव, राजेंद्र टोडीवाल, मनोज व्यास, नगरसेविका सुजाता कांबळे, नगरसेवक विजय खडसे उपस्थित होते.
पुढे पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. निसर्गाने आपल्याला मोफत पाणी, हवा, प्राणवायु या जीवनावश्यक वस्तु दिल्या. मात्र आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळेच आज ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे. यावर संयुक्त राष्ट्रसंघटनेत चर्चा सुध्दा झाली. या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका कृषी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला जास्त बसत आहे. पावसावर आपली शेती अवलंबून असल्यामुळे पाण्याचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. गतवर्षी 2 कोटी, यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड मोहीम आपण लोकांच्या सहकार्याने पूर्ण करू शकलो. सरकारच्या प्रयत्नाला लोकसहभागाची आवश्यकता असते. ग्रीन स्टेट विथ ट्रीज कडे आपण वाटचाल करीत आहोत. महर्षी विद्या मंदिर केवळ शाळा नाही तर विद्येचे मंदीर आहे. भारतीय संस्कृतिची मुल्ये मुलांमध्ये रूजवून आपली पिढी सुशिक्षित बनविण्याकडे कल असला पाहिजे. त्याचा फायदा समाजाला आणि देशालासुध्दा होईल.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही आपली परंपरा आहे. तुळस, वड, पिंपळ आदी झाडांचे वेगवेगळे महत्व आहे. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे लोकसहभागातूनच होणार आहे. इस्त्रायल येथे सर्वात कमी पाऊस पडूनसुध्दा कृषी उत्पादनात तो देश अग्रेसर आहे. नवनवीन तंत्रज्ञानाची तेथे अंमलबजावणी होत असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा तेथे योग्य वापर केला जातो. आपणही यवतमाळला हरीत जिल्हा बनविण्यासाठी संकल्प केला पाहिजे. वृक्ष लागवडीनिमित्त वडगाव रोडला सर्वधर्मसमभाव वृक्ष मोहीम आपण सुरु केली आहे. वृक्ष संगोपनाची चांगली अंमलबजावणी आपण करीत असून सामाजिक दायित्व म्हणून असे उपक्रम प्रशंसनीय आहे. जगात भारतीय या शब्दाला खुप मान आहे. 125 कोटी लोकसंख्या असलेला देश बहुधर्मीय, बहुजातीय आहे. तरीसुध्दा यांना एकत्रित गुंफुन ठेवण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. ही मुल्ये आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात एकत्र कुटुंब होते. आज कुटुंब विभक्त कधी झाले, हे कळलेच नाही. आपल्यावर सांस्कृतिक अतिक्रमण होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संस्कृती मुल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. मातृपित्रृ ऋण, गुरु ऋण आणि समाज ऋण हे विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. गुरु परंपरेला आपल्या संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. समाजाचे आपणही काही देणे लागतो, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
 विद्यार्थ्यांनो जीवनात ध्येय प्राप्तीसाठी योग्य मार्गाने परिश्रम करा. आपल्या जिल्ह्याचे नाव विविध क्षेत्रात पुढे नेतांना आपले सर्वांगीन व्यक्तिमत्व समाजासमोर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री येरावार यांनी केले. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. तत्पूर्वी गुरुपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस.एन. तिवारी यांनी केले. संचालन स्वाती लोणकर यांनी तर आभार विकास भोयर यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
                                                                       000000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी