उत्कृष्ट ग्रामविकास आराखड्यासाठी जिल्ह्याला प्रथम पारितोषिक

Ø मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लक्ष रुपयांचे बक्षीस
यवतमाळ, दि. 28 : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामविकास आराखड्यासाठी जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. आज मुंबई येथे  महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलची तिसरी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या सादरीकरणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 लक्ष रुपयांचा धनादेश यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि गणेशवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक मयुरी महातळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
ग्राम सामाजिक अभियानांतर्गत राज्यात प्रथम टप्प्यात 100 ग्रामपंचायती निवडण्यात आल्या होत्या. यापैकी 23 ग्रामपंचायती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. यात कळंब तालुक्यात 10 ग्रामपंचायती, उमरखेड 4, नेर आणि पुसद प्रत्येकी 3, यवतमाळ 2 आणि घाटंजी येथील 1 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या 23 पैकी 20 ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात आल्यावर दि. 10 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेऊन मान्यता घेण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अंतिम झाल्यावर त्याचे सादरीकरण आज मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यात कळंब तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला उत्कृष्ट ग्रामपंचायत विकास आराखड्यासाठी गौरविण्यात आले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या हजार गावांचा सर्वांगिण विकास केला जाईल. तसेच या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होईल. महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेसंदर्भात आपण नुकतीच प्रधानमंत्र्यांना माहिती दिली. त्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे. एकाच कामासाठी विविध योजना राबविण्याऐवजी अशा विविध योजनांचे एकत्रिकरण करुन गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक असते. लोकांचा सहभाग घेऊन कामे केल्यास ती निश्चितच शाश्वत होतात, असे त्यांनी सांगितले.
तर जिल्ह्याला मिळालेले प्रथम बक्षीस हे सामुहिक यश आहे. उत्कृष्ट टीमवर्क मुळे हे शक्य झाले, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले. या यशबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
                                                            000000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी