दिव्यांग व्यक्तिंसाठी मन संवेनदशील असावे - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि 15 : दिव्यांग व्यक्ती हे समाजाचा घटक आहे. शरीराच्या एखाद्या अवयवाचे दुबळेपण समाजासमोर येऊ नये म्हणून अंध, अपंग, मुकबधीर या शब्दांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग हा शब्द प्रचलित केला. दैवाने जे दिले ते दिले, मात्र यावर मात करून समाजात पुढे जाण्याचे दिव्यांगांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे दिव्यांगांसाठी समाजमन संवेदनशील असावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
दिव्य दृष्टी अपंग विकास संस्थेच्या वतीने टिळक भवनात पांढरी काठी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष दीपक मोरखडे, अँग्लो-हिंदी महाविद्यालयाचे प्राचार्य कश्यप, कारागृह अधिक्षक कीर्ति चिंतामणी, मिना राशदवार, सारिका शहा, रेखा कोठेकर, दिव्या कासावार, यशवंत धोटे, संस्थेच्या सचिव किरण यादव उपस्थित होत्या.
दिव्यांगांसाठी काम करणे हे एक सामाजिक दायित्व आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, 15 ऑक्टो. 1964 पासून अमेरिकेमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिव्यांगांसाठी काम करणा-या हेलन केअर ह्या जन्माने अंध नव्हत्या तर उपचारादरम्यान त्यांची दृष्टी गेली. मात्र त्यांनी यावर मात केली. स्वत:ला प्रस्तापित करून त्यांनी समाजाचे नेतृत्व केले. त्यामुळे दिव्यांगांनी आपल्या कलागुणांचा वापर करावा. खचून जाता कामा नये. राज्य शासनानेसुध्दा अनेक योजना आणल्या आहेत. यवतमाळ येथील समाजकल्याण विभागामध्ये दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे प्रमुख सुरजुसे हे स्वत: दिव्यांग आहे. जिल्हा परिषद व नगर परिषदेमध्ये 3 टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला जातो. हा राखीव निधी दिव्यांगासाठीच्या कोणकोणत्या योजनांवर खर्च केला याची जबाबदारी अधिका-यांवर निश्चित करण्यात आली आहे.
सरकार म्हणून दिव्यांगांपर्यंत पोहचणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी 20 लक्ष रुपयांचे साहित्य देण्यात आले आहे. नगर पालिका हद्दित कुठेही दिव्यांग व्यक्ति दिसली की कोणत्याही कागदपत्राविना त्यांना साहित्य द्यावे, असे आदेश अधिका-यांना दिले आहे. पंतप्रधान आवास योजना, अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांनी नावे द्यावी. त्यांना या योजनांचा लाभ देण्यास आपल्या सरकारचे प्राधान्य आहे. कोणताही आजार असेल तर अशा आजारांवर मुंबईत कोकिळाबेन, फोर्टिस आदी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी ने-आण करण्यापासून संपूर्ण खर्च शासन करणार आहे. दिव्यांगांना संगणक कक्ष, सेतू केंद्र किंवा झुनका-भाकर केंद्र चालवायचे असेल तर 200 मीटरचे दालन उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्याचीसुध्दा सुविधा उपलब्ध आहे. यानंतर एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर मुद्रा बँकेमार्फत कर्ज देण्यात येईल. त्यामुळे स्वत:ला कमजोर समजू नका. उंचीचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करा. शासन, समाज तुमच्या पाठिशी असून तुमच्या मदतीसाठी शासन सदैव तत्पर आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्यामराव बावनखडे, वामनराव गौरशेट्टीवार, गोपाल देविकर यांच्यासह 14 दिव्यांग व्यक्तिंना पांढरी काठी भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिवानी जाधव आणि डॉ. रुपेश तंबाखे यांनी केले. आभार किरण यादव यांनी मानले. यावेळी नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी