शासन सर्वतोपरी मदत करेल – कृषीमंत्री फुंडकर

कृषीमंत्र्यांनी केले मृत शेतकरी कुटुंबाचे सांत्वन
यवतमाळ, दि. 6 :  किटकनाशकाच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मृत शेतमजूराची पत्नी, मुलगा आणि मुलीचे सांत्वन करून शासन तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाध्यक्ष राजू डांगे विभागीय कृषी संचालक सुभाष नागरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
घाटंजी तालुक्यातील मानोली येथील बंडू सोनुले (वय 43) या शेतमजुराचा फवारणीच्या विषबाधेमुळे दि. 23 सप्टेंबर रोजी मृत्यु झाला होता. त्या गावात आज कृषीमंत्री फुंडकर, पालकमंत्री येरावार यांनी जाऊन कुटुंबासोबत चर्चा केली. तुमच्यावर ओढावलेले संकट खुप मोठे आहे. शासन शेतक-यांप्रती संवेदनशील असून तुम्हाला सर्व मदत देण्यात येईल. मुलाची नोकरी आणि मुलीच्या लग्नाबाबत काळजी करू नका. ग्रामसेवक, तलाठी कृषी सहाय्यकांनी शेतक-यांना मार्गदर्शन करावे. तसेच संपूर्ण किट घातल्याशिवाय कोणीही फवारणी करू नये. जेवढ्या किट लागतील तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जाईल. जो शेतकरी किट घालून फवारणी करणार नाही, त्याला किटचे महत्व समजावून सांगा, असे त्यांनी सांगितले.
तर फवारणीच्या औषधांची माहिती शेतक-यांना देणे गरजेचे आहे. या पंपामध्ये दोन ते तीन पट औषध जास्त टाकावे लागते. हा पंप स्वस्त असल्यामुळे तो शेतकरी खरेदी करतात. तसेच पंतप्रधान आवास योजनेत या कुटुंबाला समाविष्ठ करून त्यांच्या घरासाठीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. यावेळी कृषीमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पंपाची पाहणी केली. तसेच शेतमजूरांव्यतिरिक्त्‍ आणखी कोण कोण फवारणी करतात. फवारणी करणा-यांची गावात संख्या किती आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
तत्पूर्वी आम्हाला राहायला घरसुध्दा नाही. त्यामुळे मी मुलांना घेऊन नणंदकडे भाड्याने राहते. आम्हाला घर द्या. आमच्याकडे शेतीसुध्दा नाही. मुलाला नोकरी आणि मुलीचे शिक्षण याबाबत आम्हाला मदत करा, अशी मागणी यावेळी गिता बंडू सोनुले यांनी केली. यावेळी त्यांचा 12 वीत शिक्षण घेत असलेला मुलगा सौरभ आणि 9 व्या वर्गात असलेली पूजा उपस्थित होती.
रुग्णालयाला भेट व आढावा बैठक : कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन भरती असलेल्या विषबाधित शेतक-यांची विचारपूस केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाची आढावा बैठक घेतली.

                                                  0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी