शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त औषधसाठा ठेवा - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 5 : किटकनाशकाच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने रुग्ण भरती आहेत. रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांची योग्य काळजी घ्यावी. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना कुठलेही औषध बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त औषधसाठा ठेवावा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित अभ्यागत मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार तथा अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष डॉ अशोक उईके, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, डॉ. गिरीश जतकर, डॉ. फरहत खान, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, सदस्य प्रवीण प्रजापती, माया शेरे, प्रियंका बिडकर, जयंत झाडे, अविनाश जाणकर, अमोल ढोणे आदी उपस्थित होते.
रुग्णालयातील सद्यस्थिती काय आहे, असे विचारून पालकमंत्री येरावार म्हणाले, विषबाधेमुळे भरती झालेला एकही रुग्ण औषधीविना राहता कामा नये. सर्व औषधे त्यांच्या नातेवाईकांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातच उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी शासनाच्या वतीने जो निधी देण्यात आला आहे, तो प्राधान्याने खर्च करा. औषधासाठीचा निधी इतर कामावर खर्च होऊ देऊ नका. अतिरिक्त साठा बोलावून घ्या. शेतक-यांना नक्की कोणत्या औषधांमुळे विषबाधा झाली हे कळण्यासाठी त्यांचे नमुने तातडीने न्यायवैद्यक विभागाकडे पाठविले पाहिजे. वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवा. त्यासाठी येथे एक्सप्रेस फिडर देण्यात आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व यंत्रणा अद्ययावत असणे गरजेचे आहे. रिक्त पदांपेक्षा उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर कुशलतेने करून घ्या. तसेच रुग्णांबद्दल प्रत्येकाला संवेदना असली पाहिजे. रुग्णांप्रती आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री येरावार यांनी रुग्णालयात विषबाधेचे सध्या किती रुग्ण भरती आहेत, आतापर्यंत किती जणांना उपचार करून परत पाठविण्यात आले. त्यांच्यासाठी कोणकोणते वॉर्ड आहेत.  एवढ्या मोठ्या संख्येने विषबाधा होण्याची कारणे काय. आदी बाबींची माहिती घेतली.
यावेळी अध्यापकांची अनुपस्थिती, पदव्युत्तर अभ्यासक्रम, परिचर्या अभ्यासक्रम, पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजना, सतत व सलग वीज पुरवठा, स्वतंत्र पोलिस चौकी, जीवनावश्यक औषधी, मेडीकल स्टोअर्स, फार्मासिस्ट, कचरा विल्हेवाट, हिमोडायलिसीस, वॉटर एटीएम, डॉक्टरांची बाह्यरुग्णालयातील उपस्थिती, सोनोग्राफी मशीन, रक्तदान शिबिर, ब्लड बँक, स्टेचर, व्हील चेअर, देखभाल दुरुस्ती, वैद्यकीय दिव्यांग मंडळ, बर्न वॉर्ड, धर्मशाळा आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मेडीसीन विभागाचे डॉ. येलके यांच्यासह रुग्णालयातील विविध विभागाचे डॉक्टर्स, प्राध्यापक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
                                                            00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी