शेतक-यांना मिळणार फवारणी रक्षक किट – – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Ø तहसीलदार यांच्‍या अध्‍यक्षतेत समिती गठित

यवतमाळ, दि. 5 :  किटकनाशकांच्‍या फवारणीमुळे शेतक-यांना विषबाधा होत असून आरोग्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे उपाययोजनेचा भाग म्‍हणून बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायतींना फवारणी रक्षक किट तातडीने उपलब्‍ध करून देण्‍यात यावे. यासाठी तहसीलदार यांच्‍या अध्‍यक्षते तालुकास्‍तरावर समिती त्वरीत गठित करावी, असे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, सहायक जिल्‍हाधिकारी पंकज आशीया, निवासी उपजिल्‍हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.एम.  कोळपकर, जिल्‍हा कृषी विकास अधिकारी कळसाईत उपस्थित होते.     
जिल्‍हयातील ज्‍या तालुक्‍यांमध्‍ये किटकनाशकाच्‍या फवारणीमुळे अपघाताच्‍या घटना घडत आहे, अशा तालुक्‍यातील ग्राम पंचायतींना प्रती ग्रामपंचायतींना ५ फवारणी रक्षक किट पुरविण्‍यात येणार आहे. तसेच इतर  ग्रामपंचायतींना खबरदारीचा उपाय म्‍हणून प्रती ग्रामपंचायत २ फवारणीरक्षक किट देण्यात याव्या. यासाठी लागणारा आवश्‍यक निधी बळीराजा चेतना अभियान समितीच्‍या खात्‍यामध्‍ये जमा असलेल्‍या निधीमधुन करावा. तालुका स्‍तरावर फवारणी रक्षक किट वितरीत करण्‍याच्‍या कामाकरिता तहसीलदार यांचे अध्‍यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठित करण्‍यात येईल. सदस्‍य म्‍हणून गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लेखाधिकारी (पं.स.) यांचा समावेश राहणार आहे. समितीने ग्रामपंचायतींना देण्यात येणा-या फवारणीरक्षक किट खरेदी करण्‍याकरिता ग्रामपंचायतींना निधीचे वितरण करावे. या किट दोन दिवसांत उपलब्‍ध करून द्याव्यात.गावातील कुठलाही शेतकरी फवारणी रक्षक किटशिवाय फवारणी करणार नाही, याची दक्षता समितीने घ्‍यावी.
तसेच सीएसआरच्या माध्‍यमातून प्राप्‍त होणा-या संरक्षक किट्ससुध्‍दा कृषी विकास अधिकारी व जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत वितरीत कराव्‍यात. याबाबतची कार्यवाही तालुकास्‍तरीय समितीने पार पाडावी. ग्रामपंचायतींना पुरविण्‍यात आलेल्‍या किटची नोंदवहीमध्‍ये नोंद घेऊन ही किट फवारणीकरिता शेतक-यांना द्यावी. फवारणी झाल्‍यानंतर किट स्‍वच्‍छ करुन इतर शेतक-यांना फवारणीकरिता उपलब्‍ध करुन द्यावीत. तसेच गावातील कुठलाही शेतकरी फवारणी किट शिवाय फवारणी करणार नाही, याची दक्षता ग्रामस्‍तरीय समितीने घ्‍यावी, असे निर्देश  जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
                                                    0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी