सुरक्षा रक्षक किट वापरूनच फवारणी करा - पालकमंत्री मदन येरावार

Ø विषबाधित शेतक-यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 65 धान्याचे वाटप
यवतमाळ, दि. 17 : किटकनाशकाच्या फवारणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांना विषबाधा झाली आहे. अळींचा प्रादुर्भाव, नैसर्गिक कारणे, दोन-तीन किटकनाशकांचे मिश्रण ही कारणे तर आहेच. मात्र थोडी काळजी घेतली की आपण आपला बचाव नक्कीच करू शकतो. त्यामुळे आता फवारणीसाठी सुरक्षा रक्षक किट वापरूनच फवारणी करा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यवतमाळ येथील तहसील कार्यालयात फवारणीमुळे बाधित शेतक-यांना धान्य व सुरक्षा रक्षक किटचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर तहसीलदार सचिन शेजाळ, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, पं.दे.कृ.वि. सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, डॉ. सी.यू. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गुजर, संजय शिंदे उपस्थित होते.
गत दोन-तीन महिन्यांपासून किटकनाशक फवारणी हा विषय जिल्ह्यात गंभीर झाला आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, विषबाधा झालेल्या जवळपास 850 रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा शेतक-यांसाठी आज उभी आहे. बळीराचा चेतना अभियानातून सुरक्षा रक्षक किट वाटण्यात आल्या आहेत. गावातील कोणताही शेतकरी, शेतमजूर किटविना शेतावर जाता कामा नये, यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व रुग्णालयात अँन्टीडोड उपलब्ध करण्यात आले असून शेतक-यांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. असे प्रसंग पुन्हा येणार नाही, यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे गरजचे आहे.
विषबाधेमुळे जे दगावले त्यांना सरकारने तात्काळ मदत जाहीर केली. पैशाने कोणतीही हानी भरून निघणार नाही. मात्र याबाबत शासन अतिशय गंभीर आहे. केंद्राकडून अतिरिक्त मदत मिळण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे. या दरम्यान ज्यांची मजूरी बुडाली आहे त्यांना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पाच आमदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीला एक महिन्याचे वेतन दिले आहे. कृषी शास्त्रज्ञांकडून जे मार्गदर्शन येथे मिळाले ते आपापल्या गावात जाऊन सांगा. तसेच फवारणीच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्व सुचनांचे काळजीपूर्वक पालन करा. सरकार म्हणून जे काही तुमच्यासाठी करता येईल, ते नक्कीच केले जाईल, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.
यावेळी गजानन मनडोले, बेबी वाघ, दिगांबर हुलगुडे यांच्यासह प्रत्येक शेतक-याला पालकमंत्र्यांकडून 25 किलो तांदूळ, 25 किलो गहू, 5 किलो तेल, 5 किलो साखर, 5 किलो डाळ असे एकूण 65 किलो धान्याची किट देण्यात आली. तसेच सुरक्षारक्षक किट आणि धनादेशचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी सर्व विषबाधित शेतकरी, शेतमजूरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 
                                     00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी