आरोग्य यंत्रणेने संपूर्ण क्षमतेने काम करावे - आरोग्यमंत्री दीपक सावंत

Ø  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक
यवतमाळ, दि. 6 :  किटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यावर ओढावलेले संकट हे अतिशय गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात विषबाधित रुग्णांना उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जे भरती आहेत, त्यांची योग्य काळजी घ्या. वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणारे नागरिक हे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील असतात. तज्ज्ञ डॉक्टरांची येथे कमी नाही. त्यामुळे अशा आपात्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने संपूर्ण क्षमतेने काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसलू राज्यमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, जिल्ह्याचे पालकसचिव व्ही. गिरीराज, आरोग्य विभागाचे आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आदी उपस्थित होते.
विषबाधित रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेऊन आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, रुग्णांवर उपचार करतांना औषधीचा तुटवडा पडू देऊ नका. लगेच अतिरिक्त औषधी खरेदी करा. वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया आता जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर लवकरच डॉक्टरांना नियुक्ती देण्यात येईल. जिल्ह्यात जे ट्रॉमा सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून तयार आहेत मात्र उद्घाटन न झाल्यामुळे ते सुरु करण्यात आले नाही, असे वैद्यकीय केंद्र त्वरीत सुरू करा, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी  दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्याची परिस्थिती, बंद असलेले दवाखाने, ग्रामीण भागात शासकीय वैद्यकीय केंद्रात उपलब्ध औषधीसाठा, ॲम्बुलन्सची स्थिती, रिक्त जागा आदींबाबत आढावा घेतला.
तर जिल्ह्यात कृषी विभागाच्या ज्या काही जागा रिक्त आहेत, त्या येत्या आठ दिवसांत भरल्या जातील, असे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने डॉक्टर मुख्यालयी राहण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा त्वरीत पूर्ण करू, असे पालकमंत्री मदन येरावार म्हणाले. विषबाधेचे रुग्ण जिल्ह्यात जास्त आढळतात, अशा परिस्थितीत प्राथमिक स्तरावरच त्यांच्या शरीरातील विष काढण्यासाठी आरोग्य विभागाने उपकरण उपलब्ध करून द्यावे, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. तर आरोग्य आणि कृषी यंत्रणा यवतमाळ जिल्ह्यात अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी.चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, महाविद्यालयाचे डॉ. येलके, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागाचे डॉक्टर्स आणि प्राध्यापक उपस्थित होते.
                                                000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी