‘मिशन समृध्दी’ अंतर्गत 19 ग्रामपंचायतींचा सत्कार



   
यवतमाळ दि.16 : समुदाय सक्षमीकरण, मग्रारोहयो, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आजिविका निर्मिती या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या तसेच इतरांना प्रेरणा देणा-या 19 ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषद आणि मिशन समृध्दी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, राज्य नियोजन आयोगाचे सदस्य व्ही. गिरीराज, मिशन समृध्दीचे कार्यक्रम संचालक राम पप्पू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मनोज चौधर, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे डॉ. किशोर मोघे आदी उपस्थित होते.
समुदाय सक्षमीकरणांतर्गत उत्कृष्ट कार्य कुंभारी ग्रामपंचायतीने केले असून डांगरगाव, नारळी, साकूर, पारडी कालेश्वर या ग्रामपंचायतींचा, मग्रारोहयो अंतर्गत प्रथम क्रमांक निगनुर ग्रामपंचायतीचा असून पिंपरी बोरी, बोरी (बु.), धानोरा, आवरगाव, जारुर, बोरीवन या ग्रामपंचायतींचा, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अंतर्गत प्रथम क्रमांक सिंगलदेवी ग्रामपंचायत ठरली असून किटा आणि देवधारी या ग्रामपंचायतींचा आणि आजिविका निर्मिती अंतर्गत प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत पारडी (सावलापूर)  असून कोटा, एकलारा, चिखलवर्धा या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सचिव आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मानपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे म्हणाल्या, राष्ट्रविकासाच्या दृष्टीने ग्रामीण भाग महत्वाचा आहे. ग्रामपंचायतींवर गावाच्या विकासाची जबाबदारी असते. मिशन समृध्दी अंतर्गत जिल्ह्यातील काही सरपंच, उपसरपंच, सचिव, बचत गटाचे सदस्य यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांच्या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला आहे. यापासून इतरही ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा. तसेच शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून लोकसहभागातून गावाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. तर व्ही गिरीराज म्हणाले,  2016 मध्ये मिशन समृध्दीच्या संस्थापकांनी यवतमाळला भेट दिली होती. प्रत्येकच तालुक्यात एक-दोन गावांचे काम उल्लेखनीय असते. विविध योजनांची तेथे प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. अशा माध्यमातून गावांचा सत्कार झाला की, इतरही गावांना प्रेरणा मिळते. ग्राम विकासाची ही एक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. तसेच प्रेरणा देणा-या गावांचा उत्सव या पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे यांनी केले. संचालन किशोर जगताप यांनी तर आभार श्रीकांत लोडाम यांनी मानले. कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त गावातील सरपंच, उपसरपंच, सचिव, बचत गटाचे सदस्य यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी