पिकांची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’





v कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकीकृत व्यवस्थापन करण्याचे आवाहन
यवतमाळ दि.7 : सुरूवातीला पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कपाशी पात्यावर व फुलावर आली आहे. यावर डोमकळी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पिकांची पाहणी व याबाबत कृषी विभागाच्या उपाययोजना प्रत्यक्ष बघण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ‘ऑनफिल्ड’ वर होते.
यवतमाळ तालुक्यातील मौजे हिवरी येथील शेतकरी बबनराव चेके यांच्या शेतातील कापूस पिकांची त्यांनी यावेळी पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.सुरेश नेमाडे, शास्त्रज्ञ किटकशास्त्र डॉ.प्रमोद मगर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर राठोड, कृषी सहाय्यक श्रीमती बाळसराफ व ग्रामस्त तसेच शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी वेळीच जागृत राहून गुलाबी बोंडअळीचे एकीकृत व्यवस्थापन करावे. तसेच कृषी विभागाने याबाबत मोहीम स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कापूस पिक पात्यावर व फुलावर असतांना डोमकळी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा याबद्दल शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. सदर डोमकळ्या पुर्णपणे नष्ट कराव्यात जेणेकरून पुढील प्रादुर्भाव कमी करणे शक्य होईल. यासाठी क्विनॉलफॉस 20 ए. एफ प्रती 10 लिटर पाण्यामध्ये 23 ते 25 मिली, क्लोरपायरीफॉस 50 टक्के ई.सी. 12 ते 20 मिली, थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी. 20 ग्रॅम, इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी., 3.8 ते 4.4 ग्रॅम, इन्डोक्झाकार्ब 15.8 ई.सी. 10 मिली, क्लोरपायरीफॉस 16 टक्के 33 ते 50 मिली, अल्फासायपरमेथ्रीन 1 टक्के ई.सी. क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के ई.सी. 10 ते 20 मिली, क्लोरणट्रानिलीप्रोल 9.3 टक्के लेम्ब्डा सायाहालोथ्रीन 4.6 झेड सी 5 मिली घ्यावे.
तसेच शेतक-यांनी बांधावरील सभोवताली असणाऱ्या किटकांच्या पर्यायी खाद्य वनस्पती अंबाडी, रानभेडी नष्ट कराव्यात. शेतात पक्षी थांबे लावावे. गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी प्रत्येक महिन्यात काय करावे याबाबातसुध्दा माहिती देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात निंबोळीअर्क 5 टक्के किंवा अझाडीरेक्टीन 300 पीपीएम हे किटकनाशक 50 ते 100 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सप्टेंबर महिन्यात क्विनॉलफॉस 20 ए.एफ 23 ते 25 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी. 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऑक्टोबर महिन्यात क्लोरोपायरीफॉस 20 टक्के इ.सी. 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के इ.सी. 12 ते 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी.20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नोव्हेंबर महिन्यात फेनव्हलरेट 20 ई.सी. 5.5 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 इ.सी. 7.5‍ मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी