पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा




       यवतमाळ दि.16 : नागरिकांना भौतिक सुविधा व शेतक-यांना पूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासंदर्भात करण्यात येणा-या उपायोजनांबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यात बसस्थानकाचे नुतणीकरण, शेतक-यांना मत्स्यशेतीकरीता प्रोत्साहित करणे, 33 कोटी वृक्ष लागवड, बसस्थानक ते नागपूर बायपासपर्यंतचा मुख्य रस्ता आदी विषयांचा समावेश होता.
            बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सा.बा. विभागाचेअधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, के. अभर्णा, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी, कार्यकारी अभियंता शीतल गोंड, आगार व्यवस्थापक अविनाश राजगुरे आदी उपस्थित होते.
            बसस्थानक नुतणीकरणाचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी परिवहन मंडळाने तातडीने पाऊले उचलावी. यापूर्वीच वेळेत संपूर्ण प्रक्रिया परिवहन मंडळाने करणे अपेक्षित होते. नुतणीकरणाचे काम सुरू करण्यासाठी या मार्गावर असलेली वाहतूक पोलिस विभागाने इतरत्र वळवावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी बसस्थानक ते नागपूर बायपास हा 3.5 किमी रस्त्याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. सदर रस्ता केंद्रीय मार्ग निधीतून एका वर्षात पूर्ण करायचा असून त्यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
            शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती करण्याची योजना निरंतर सुरू ठेवावी. ही योजना शेतक-यांच्या हिताची आहे. केम प्रकल्प जरी बंद असला तरी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षीसुध्दा शेततळ्यांमध्ये मत्स्यशेतीचे नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
            33 कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतांना ते म्हणाले, 15 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात 68 टक्के वृक्ष लागवड झाली आहे. रेशीम शेतीकडे शेतकरी वळत आहे. त्यामुळे रेशीम शेतीतून लागवडीचे उद्दिष्ट साध्य करा. जिल्ह्यात विविध धरणांसाठी संपादित करण्यात आलेली जमीन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या अतिरिक्त जमिनीवर वृक्ष लागवड केली तर जमिनीची सुपिकता वाढेल तसेच त्याची धूप थांबेल, असे त्यांनी सांगितले.
            यावेळी पालकमंत्र्यांनी अटल आनंद वन योजनेचा तसेच यवतमाळ शहरातील नगर परिषद नाट्यगृह बांधकामाचा आढावा घेतला.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी