टिपेश्वर पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक





v गावक-यांचीही उपस्थिती
यवतमाळ दि.8 : टिपेश्वर अभयारण्यासाठी जमिनी दिलेल्या गावक-यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, त्यांना आवश्यक सोयीसुविधा, प्रकल्पग्रस्तांचे दाखले आदी बाबींची पुर्तता व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गावक-यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, पांढरकवडाच्या प्र.उपविभागीय अधिकारी संगिता राठोड, घाटंजीच्या तहसीलदार पुजा माटोळे, सहाय्यक वनसंरक्षक प्रमोद पंचभाई, अंबादास सुरपाम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, या गावातील तरुणांना वन विभागामार्फत गाईड म्हणून रोजगार व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे. याबाबत गावक-यांनी पात्र असलेल्या युवक-युवतींची नावे कळवावीत. या गावात स्वत: धान्य दुकान देण्याबाबत जाहीरनामा काढावा, जेणेकरून गावक-यांना गावातच धान्याची उचल करता येईल. गावक-यांना देण्यात येणा-या रकमेचे धनादेश रक्कम प्राप्त होताच तात्काळ देण्यात यावे. वाढीव मोबदल्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. तसेच पुनर्वसित गावात आवश्यक सोयीसुविधा, विशेष पॅकेज, प्रकल्पग्रस्तांचे दाखले आदी सर्व बाबींची पुर्तता करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
गावक-यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यामुळे आवश्यक टिपेश्वर अभयारण्याच्या मातणी गेटवर बसलेल्या उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.
यावेळी गावक-यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले. बैठकीला गावातील कैलास कोरवते, सुधाकर येडमे, कुसूम येळमे, चंद्रकांत मेश्राम, मनिषा पेंदारे आदी गावकरी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी