पूरग्रस्तांच्या मदतीकरीता यवतमाळकरांनी समोर यावे






v स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांचे आवाहन
यवतमाळ दि.15 : गत आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागात महापूराचा प्रलय नागरिकांना वेदना देऊन गेला. संकटाच्या या काळात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पूरग्रस्त बांधवाच्या मदतीकरीता अनेक सामाजिक संघटना व नागरिक समोर आले आहे. यवतमाळकरांनीही या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता मदतीचा हात समोर करावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर आदी उपस्थित होते.
शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार विकासाच्या अनेक योजना राबवित आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात विविध योजनांची प्रशासनाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. शेतक-यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पीएम-किसान योजनेंतर्गत जिल्ह्यात 79 हजार 479 शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पहिला हप्ता तर 15 हजार 548 शेतकरी कुटुंबाच्या खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा जिल्ह्यातील 2 लक्ष 21 हजार 941 शेतकरी सभासदांना लाभ मिळाला असून कर्जमाफीचे 1189 कोटी 49 लक्ष रुपये बँकेत जमा करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानात चार वर्षात 1337 गावांमध्ये मृद व जलसंधारणाची जवळपास 50 हजार कामे पूर्ण झाल्यामुळे 1 लक्ष 14 हजार 249 हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 7597 शेततळ्यांची निर्मिती करणारा यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत 93 सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असून 31 बांधकामाधीन आहेत. गत पाच वर्षात विविध प्रकल्पातून 8815 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात 17  हजार 417 धडक व मग्रारोहयो सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. पाच वर्षात 22 हजार 317 शेतक-यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग 361 साठी 421.27 हेक्टर आर. क्षेत्र (89.89 टक्के) संपादीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 184 किमी. लांबीच्या वर्धा – नांदेड रेल्वे मार्गासाठी  97.20 टक्के क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. संपादीत क्षेत्रापैकी  1098.38  हेक्टर क्षेत्राचा ताबा रेल्वे प्राधिकरणास देण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत 467.60 कोटींचा मोबदला संबंधित शेतक-यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पाच वर्षात 788 किमी. ची 45 कामे पूर्ण तर 108 कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 213 किमी. लांबीची सर्व 36 कामे पूर्ण झाली आहेत. हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत जिल्ह्यात 307 किमी. ची आठ कामे मंजूर असून प्रगतीपथावर आहेत.
पिक विम्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतक-यांना 352.41 कोटी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आजपर्यंत 25 हजार 318 रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 8591 रुग्णांवर उपचार झाला आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत 14 हजार 350 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उमेद अंतर्गत जिल्ह्यातील 9403 समुहांना 14 कोटी रुपयांचे खेळते भांडवल देण्यात आले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मिळालेल्या दोन डायलिसीस मशीनवर आजपर्यंत 363 रुग्णांचे डायलिसीस करण्यात आले. आता जिल्हा रुग्णालयाला नव्याने 12 डायलिसीस मशीन मंजूर झाल्या असून त्या लवकरच कार्यान्वित होईल. किटकनाशक फवारणीच्या विषबाधित रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यासाठी पॉईझन कंट्रोल सेंटरची निर्मिती करण्यात येत आहे. स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटी व टाटा रिसर्च सेंटर यांच्या मार्फत 50 खाटांचे एनआयसीयु लवकरच कार्यान्वित होणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराचा चेतना अभियानामार्फत आतापर्यंत 86 हजार 789 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
केंद्र सरकारने दूरगामी राष्ट्रहिताचा विचार करून नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मिरसाठी लागू असलेले 370 आणि 35 ए हे कलम रद्द केल्यामुळे इतर घटक राज्यांप्रमाणेच हा प्रदेश आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. सर्व देशवासीयांकरीता ही अतिशय आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांना सन 2017 व 2018 या सलग दोन वर्षाकरीता शौर्य पदक मिळाले आहे. राज्याच्या आयपीएस संवर्गात एकाच पोलिस अधिका-याला सलग दोन वर्ष शौर्य पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी काळात आपल्याला निवडणुकांना सामोरे जायचे आहे. प्रत्येक मतदाराने त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कारप्राप्त एम.एन.चवरे, आंतरिक सुरक्षा सेवा पदकप्राप्त सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेत निवड झालेले अंश प्रविण इंगळै, प्रवीण देमा अंबुरे, शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविणारे सिध्दी विश्वेश्वर वानखेडे, आर्यन रविकिरण इडातकर यांच्यासह पाटंबधारे विभागाचे अशोक जयसिंगपुरे, जिल्हास्तर युवा पुरस्कारप्राप्त शुभम बैस, शिवाणी अवगण आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरग्रस्तांना मदत म्हणून निलीमा वानखेडे यांनी एक लक्ष रुपयांचा धनादेश, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि महसूल कर्मचारी संघटना यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, विर पिता, विर माता, विर पत्नी, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी वर्ग, नागरिक आदी उपस्थित होते.
००००००००




Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी