लोकमान्य टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी - पालकमंत्री



    
v टिळकवाडी येथे लोकमान्यांच्या प्रतिमेचे व हायमास्ट लाईटचे लोकार्पण
v पूरग्रस्तांसाठी विविध पतसंस्थांकडून धनादेश सुपुर्द
यवतमाळ दि.16 : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वराज्यचं सुराज्यात रुपांतर करणे ही आपली जबाबदारी आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळविणारचं’ अशी गर्जना देऊन लोकांच्या मनात स्वातंत्र्याची क्रांतीकारक मशाल पेटविण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. पत्रकार, प्रखर देशभक्त, जहाल राष्ट्रवादी अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे ते ख-या अर्थाने धनी होते, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त टिळकवाडी येथे लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे व हायमास्ट लाईटचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अनिल दंडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ मार्गदर्शक उमेश वैद्य, नगरसेवक अजय राऊत, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, राजू कावळे आदी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक दोन वेळा यवतमाळमध्ये आले, याचा उल्लेख करून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, या परिसरात लोकमान्य टिळकांची प्रतिमा लावून टिळकवाडी येथील नवीन पिढीने उचललेले पाऊल अभिमानास्पद आहे. अतिशय सुंदर प्रतिमा येथे लावण्यात आली आहे. नवीन पिढीला स्वराज्य उपभोगायचे एवढेच माहित आहे. मात्र येथील युवकांनी एक आदर्श उभा केला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढयात लोकमान्य टिळकांपासून आगरकरांपर्यंत एक मोठी परंपरा आहे. स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य दिले त्यांची ओळख होणे काळाची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला धनादेश देणा-या पतसंस्थाचे तसेच नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
जेष्ठ मार्गदर्शक उमेश वैद्य म्हणाले, 15 ऑगस्ट 1905 रोजी लोकमान्य टिळक हे सर्वप्रथम यवतमाळ येथे आले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी 1917 मध्ये ते पुन्हा या शहरात आले. आपल्या व्यवस्थापनाने आपला कारभार चालावा, या उद्देशाने लोकमान्यांनी होमरुल चळवळ सुरू केली होती. बाळ गंगाधर टिळक हे देशासाठी जगले. ख-या अर्थाने ते लोकमान्य होते. शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करून लोकशिक्षणाचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. लोकमान्यांची प्रतिमा लावण्यात आलेला परिसर हा दररोज स्वच्छ ठेवावा, त्यासाठी येथील नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून अनेक सहकारी पतसंस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केले. यात चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था 1 लक्ष रुपये, जनता नागरी सहकारी पतसंस्था 51 हजार, कै.बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था 51 हजार, महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था 25 हजार, साईबाबा नागरी सहकारी पतसंस्था 21 हजार, टिळक युवक मंडळ 11 हजार, नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था 11 हजार रुपये यांचा समावेश होता.
तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार व मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे तसेच येथे लावण्यात आलेल्या हायमास्ट लाईटचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल गंजीवाले यांनी केले. संचालन ललिता जतकर यांनी तर आभार राम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी